खानापूर : खानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करत आठ घरांची तोडफोड केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक लाळसाब गौंडी यांच्यासमोर या गुन्ह्याचा तपास मोठे आव्हान ठरणार आहे.
खानापूर तालुक्यातील गुंजी, करंबळ आणि देवलत्ती या गावांमध्ये चोरट्यांनी घरफोड्यांचा सपाटा लावला आहे. गुंजी गावातील आठ घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. यामध्ये उमेश तमुचे यांच्या घरातून १० हजार रोख आणि ३-४ लाखांचे दागिने चोरीला गेले. तसेच राजाराम कल्लप्पा गुरव आणि इटगी या शेतकऱ्यांच्या घरांमध्येही चोरीचा प्रयत्न करण्यात आला. चोरट्यांनी याच गावातील विनायक पुंडलिक घाडी, महादेव करंबळकर, मुल्ला आणि तुकाराम घाडी यांच्या घरांची कुलपे तोडली, मात्र घरात मौल्यवान वस्तू नसल्याने ते रिकाम्या हाताने निघून गेले.
या घटनेमुळे गुंजी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक सतर्क झाले असल्याने काही ठिकाणी चोरी रोखण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने तपासाला गती दिली आहे.