Monday , December 8 2025
Breaking News

वनमंत्री व पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करून म्हादई नदीचे पाणी वळविणे थांबवावे

Spread the love

 

पर्यावरणी फाउंडेशनच्या वतीने निवेदन सादर

खानापूर : खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य व मलप्रभा नदीचे संवर्धन करण्यासाठी तसेच हुबळी, धारवाड, नवलगुंद रामदुर्ग तसेच गदग या भागाला पर्यायाने उत्तर कर्नाटकाचे वाळवंटीकरण होण्यापासून वाचविण्यासाठी म्हादाई नदीचे पाणी वळविणे त्वरित थांबवावे यासाठी वनमंत्री व पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशा आशयाचे निवेदन पर्यावरणी फाउंडेशनच्या वतीने जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी व वनमंत्री ईश्वर खांड्रे यांना देण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे कॅप्टन नितीन धोंड, कर्नल रवींद्र सैनी, गीता साहू, सुजित मुळगुंद, आदी पर्यावरण प्रेमी उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, 1997 ते 2011 पर्यंत सलग पंधरा वर्षे आम्ही धारवाडचे दिवंगत लेफ्टनंट जनरल एस. सी. सरदेशपांडे यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुक्यातील पश्चिम घाटाच्या जंगल भागाला वन्यजीवी अभयारण्य म्हणून घोषित करून संरक्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती जमा करून ती आत्मसात करण्यासाठी भूक्षेत्रीय कामात समर्थन देण्यासाठी प्रयत्न केले होते. उत्तर कर्नाटकाच्या पश्चिम – नैऋत्य कडील जंगल भागाचे संरक्षण करणे तसेच खानापूर तालुका आणि उत्तर कर्नाटकाची जलसुरक्षा आणि पर्यावरणीय सुरक्षा सुनिश्चित करणे हे आमचे उद्दिष्ट होते. या प्रयत्नांना कर्नाटक सरकारने 2011 मध्ये जागतिक पर्यावरण दिनी कर्नाटकाच्या तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या हस्ते परिसर मित्र पुरस्कार देऊन मान्यता देखील दिली होती. खानापूर तालुक्यातील मलप्रभेच्या पाणलोट क्षेत्रातील पावसासाठी हा जंगल भाग पोषक ठरतो. या जंगलामुळे या भागात मुसळधार पाऊस होतो. नवलतीर्थ धरणात येणारे 80 टक्के पाणी हे खानापूर तालुक्यात होणाऱ्या पावसाचे आहे. खानापूर तालुक्याला दक्षिणेचे प्रती चेरापुंजी असे देखील संबोधले जाते. त्यामुळे उत्तर कर्नाटकाची जलसुरक्षा निश्चित करण्यासाठी भीमगड अभयारण्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे.

भीमगड वन्यजीव अभयारण्यात उगम पावणारी म्हादई नदी ही भीमगड वन्यजीव अभयारण्यासह त्याच्याशी संबंधित राखीव आणि संरक्षित जंगलांची आणि 1000 चौरस किलोमीटरच्या पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रांची जीवनरेखा आहे.

भांडुरा धरणाव्दारे म्हादई नदीचे प्रवाह वळवल्यास भांडुराचा संपूर्ण प्रवाह अभयारण्याकडे वळेल जो अभयारण्यासाठी मृत्यूची घंटा ठरेल. प्रवाह वळवल्यामुळे खानापूरमधील पावसावर पर्यायाने नवलतीर्थमधील पाण्यावर अपरिवर्तनीय आणि विनाशकारी परिणाम होईल. परिणामी उत्तर कर्नाटकला जलद वाळवंटीकरणाकडे ढकलले जाईल. आम्ही तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की म्हादई नदीचे पाणी वळविण्यासाठी बांधलेले भांडुरा, कळसा आणि हलतारा धरणे ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर नुसार पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील प्रदेश श्रेणीमध्ये आहेत.

गाडगीळ आणि कस्तुरीरंगन यांच्या अहवालानुसार यापूर्वी या धरणांच्या परिसराला पर्यावरणीयदृष्ट्या सर्वात संवेदनशील प्रदेश म्हणून ओळखले गेले आहे. एक सुशिक्षित अभियंता, तंत्रज्ञान-जाणकार आणि आमच्या जंगलाच्या संरक्षणाची खरोखर काळजी घेणारे म्हणून आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो की तुम्ही उत्तर कर्नाटकला वाळवंटीकरण आणि विनाशापासून वाचवण्याच्या दीर्घकालीन हितासाठी म्हादई नदीचे पाणी वळवणे त्वरित थांबवावे आणि त्याकरिता हस्तक्षेप करावा, असा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदनासोबत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर आणि नॉर्वेजियन इन्स्टिट्यूट फॉर वॉटर रिसर्च यांचे अहवाल देखील जोडले आहेत. निवेदन सादर करतेवेळी कर्नल सैनी, साहू, मुळगुंद, कॅ. धोंड यांच्यासह नायला कोएल्हो, लिंगराज जगजंपी, अ‍ॅड. सुनीता पाटील, अमृत चरंतीमठ, अ‍ॅड. नीता पोतदार वगैरे पर्यावरणी फाउंडेशनचे अन्य सदस्य उपस्थित होते.

 

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *