
खानापूर : खानापूर तालुक्यात पावसामुळे मलप्रभा नदीला पूर आला आहे. कणकुंबी येथे असलेल्या मलप्रभा नदीच्या उगमस्थानाजवळ, कुसमळी गावाजवळ एका नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी अचानक वाढली आणि बांधकामाधीन भागातील तात्पुरता मातीचा रस्ता पूर्णपणे खचून गेला. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. हा रस्ता जांबोटी आणि चोर्लामार्गे गोव्याला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे. जुना पूल पाडून नवीन पुलाचे काम सुरू होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे केवळ रस्ताच खचला नाही, तर बांधकामाधीन पूलही अंशतः पाण्याखाली गेला आहे.सध्याच्या परिस्थितीनुसार, पावसाळा संपेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. यामुळे गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना आता बेळगाव, खानापूर, रामनगर मार्गे लांबच्या पर्यायी रस्त्याने प्रवास करावा लागणार आहे. याचा प्रवासाचा कालावधी आणि खर्च दोन्ही वाढणार असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta