
खानापूर : कर्नाटक सरकारकडून सीमाभागात कन्नडसक्ती तीव्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे मराठी भाषिकांच्या घटनात्मक अधिकारांवर कर्नाटक प्रशासन एक प्रकारे गदा आणत आहे. भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार मराठी भाषिकांना कन्नडसह मराठीतही शासकीय परिपत्रके मिळण्याचा अधिकार आहे परंतु कर्नाटक सरकार बेकायदेशीररित्या सीमाभागात कन्नडसक्ती करत आहे. या विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी समिती प्रेमी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. कन्नडसक्ती विरोधात मोर्चात सहभागी होण्यासाठी खानापूर तालुका समितीतर्फे तालुक्यात जनजागृती करण्यात येत आहे. आज बुधवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी नंदगड येथे जनजागृती करण्यात आली. समिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन पत्रकांचे वाटप केले व नागरिकांशी संवाद साधला. त्याचप्रमाणे मराठी अस्मिता व मराठी संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी या लढ्यात सहभागी व्हा, असे आवाहन नंदगडवासियांना करण्यात आले. कर्नाटक सरकारचा वाढता अत्याचार व बेकायदेशीररित्या चालू असलेले कानडीकरणाच्या विरोधात लढण्याचा निर्धार नंदगड येथील मराठी भाषिकांनी यावेळी व्यक्त केला.
या जागृती फेरीत खानापूर तालुका म. ए. समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, समिती नेते राजाराम देसाई, मोहन गुरव सुधीर पाटील, अशोक ईश्वर पाटील, संजीव रामचंद्र पाटील, नारायण नागाप्पा पाटील, रामू पालवाडकर, ज्योतिबा कंग्राळकर, शंकर येळ्ळूरकर, गुराप्पा पाटील, विनायक चव्हाण, मल्हारी गुरव, पुंडलिक गुरव, चंद्रकांत देसाई, विठ्ठल भेकणे, शंकर गुरव तसेच आदीजण उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta