

खानापूर : राज्य सरकारच्या पाच गॅरंटी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी खानापुरात राज्याध्यक्ष एच. एम. रेवाण्णा यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सत्तेत येण्यापूर्वी काँग्रेसने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार पाच गॅरंटी योजना सुरू केल्या आहेत. गृहलक्ष्मी, गृहज्योती, अन्नभाग्य, शक्ती योजना तसेच युवा निधी या सर्व योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सरकारकडून शक्य ते प्रयत्न सुरू आहेत. या योजनांची अंमलबजावणी कार्यक्षमतेने व्हावी यासाठी राज्यस्तरीय जिल्हा व तालुकास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली असून या सर्व योजनांचे समन्वय करण्यासाठी गॅरंटी अनुष्ठान योजनेचे राज्याध्यक्ष व माजी मंत्री एच. एम. रेवण्णा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रेवण्णा यांनी यापूर्वी देखील मंत्री असताना संगोळी रायण्णा समाधी स्थळाच्या विकासासाठी प्रयत्न केले होते. सध्या देखील ते या विकास कामात सक्रिय आहेत.
दरम्यान, मंत्री शिवराज तंगडगी नंदगड येथे आगमन झाल्याने एच. एम. रेवण्णा यांनी खानापूरात येऊन त्यांची भेट घेतली. दोघांनी मिळून संगोळ्ळी रायण्णा यांच्या समाधीस्थळाची आणि ऐतिहासिक फाशीस्थळाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देखभाली व विकासकामांबाबत काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
यावेळी खानापूर तालुका गॅरंटी योजनेचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी, तसेच प्रकाश मादार, इसाक पठाण, शांताराम गुरव, रुद्रापा पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी रेवण्णा यांची भेट घेऊन तालुक्यात सुरू असलेल्या योजनांबाबत माहिती दिली.
बैठकीदरम्यान रेवण्णा यांनी तालुका समितीचे अध्यक्ष व सदस्यांना सूचित केले की, खानापूर तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन लोकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवावी, तसेच शिबिरांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे सांगितले.
खानापूर तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी रमेश मेत्री यांनीही या बैठकीत समाधान व्यक्त करत सांगितले की, खानापूरात गॅरंटी अनुष्ठान कमिटी नियमितपणे बैठक घेत असून, योजनांच्या अंमलबजावणीत चांगली प्रगती दिसत आहे.
तसेच उपस्थित इतर तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनीही समितीशी संवाद साधून योजनांच्या प्रगतीबाबत माहिती दिली आणि प्रत्येक नागरिकापर्यंत राज्य सरकारच्या गॅरंटी योजना पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

Belgaum Varta Belgaum Varta