बेळगाव : हलशीवाडी ता. खानापूर येथे शनिवार (ता. 26) ते सोमवार (ता. 28) पर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हलशी येथील सटवाप्पा पवार महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार आहे.
शनिवारी सायंकाळी 4 वाजता पोथी स्थापना, पंचपदी, आरती व तिर्थ प्रसाद होणार आहे. रात्री 9 वाजता निंजीनकोंडल येथील म्हातृ वांद्रे यांचे कीर्तन होईल त्यानंतर गुंडपी येथील मरेव्वा देवी भजनी मंडळीचा भजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
रविवारी (ता. 27) रोजी पहाटे 5 वाजता काकडा आरती, 8 वाजता ज्ञानेश्वरीच्या 9 व 12 व्या अध्यायाचे सामुदायिक पारायण, 3 वाजता तुकाराम गाथ्यावरील भजन, 5 वाजता प्रवचन व राम कृष्ण बीज मंत्राचा जप तर 9 वाजता हलशीवाडी येथील रवींद्र अनंत देसाई यांचे कीर्तन होईल त्यानंतर माऊली भजनी मंडळ, कापोली यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
सोमवारी (ता. 28) रोजी पहाटे माऊली दिंडी पूजन होऊन दिंडी सोहळा पार पडणार असून 10 वाजता काला कीर्तन होऊन महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे.
पारायणाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त हलशीवाडी ग्रामस्थ व वारकऱ्यांतर्फे करण्यात आले आहे.
