खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथे मंगळवारी दि. 29 रोजी महाप्रसादाने पांडुरंग सोहळ्याची सांगता झाली.
सालाबादप्रमाणे यंदाही श्री पांडुरंग सप्ताहला सोमवारी दि. 28 पासून प्रारंभ झाला. सोमवारी सकाळी ध्वजारोहण होऊन उत्सवाची सुरूवात झाली. तर हभप पुंडलिक पांचगे यांच्या अध्यष्ठानाखाली ज्ञानेश्वरी 9 वा. व 12 वा. अध्ययाचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
त्यानंतर इदलहोंड, अंकले, निट्टूर, गणेबैल, काटगाळी, खेमेवाडी, निडगल, गर्लगुंजी गावचे सांप्रदायिक भजन होऊन चापगांव गावच्या श्री बाल भजनी मंडळाचा भारूडाचा कार्यक्रम पार पडला.
मंगळवारी दि. 29 रोजी पहाटे काकड आरती, पंचवटी होऊन सकाळी 8 वाजता सिंगीनकोप गावातून श्रीच्या पालखीचा दिंडी सोहळा पार पडला. दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाविकांनी महाप्रसादासाठी गर्दी केली होती.
येत्या सोमवारी दि. 4 एप्रिल रोजी सिंगीनकोप गावचे ग्रामदैवत श्री कलमेश्वर देवतेची यात्रा आयोजित करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी करडी मजल व भजनाच्या नादात गावातून देवीची पालखी व आंबील गाडे कलमेश्वर मंदिरकडे प्रयाण होणार आहेत.
मंगळवारी दि. 5 रोजी सकाळी 7 वाजता मानकर्यांच्या हस्ते पिंडीचा अभिषेक, त्यानंतर इंगळ्याचा कार्यक्रम होऊन दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे आयोजन होणार आहे. तरी भाविकानी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंगीनकोप गावच्या पंच कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
