
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कबनाळी गावाला खानापूर-कबनाळी अशी बससेवा सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन तालुका विकास आघाडीतर्फे बस आगार व्यवस्थापक महेश यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी खानापुर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील व इतर निवेदनात म्हटले आहे की, खानापूर ते निलावडे मार्गे कबनाळी गावासाठी बस सुविधा व्हावी. कारण खानापूर शहराच्या पश्चिमेला घनदाट जंगलात कबनाळी गाव आहे. या गावातील अनेक विद्यार्थी शाळा महाविद्यालयासाठी खानापूर येतात. तर अनेक लोक बाजार, बँक व विविध शासकीय कामासाठी, दवाखान्याला खानापूरला नेहमी येत असतात. कबनाळी गावच्या जनतेला तीन किलोमीटरचे अंतर कापून निलावडे गावाला यावे लागते. त्यानंतर बस किंवा खाजगी ट्रॅक्सने खानापूरला यावे लागते. कबनाळी ते निलावडे दरम्यान घनदाट जंगल आहे. या जंगलात अस्वले, वाघ आदींसह अन्य हिंस्त्र प्राणी आहेत. एकटे दुकटे या रस्त्यावरून आल्यास सदर प्राण्याकडून माणसावर हल्ला होऊ शकतो. अशा अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यासाठी या भागातील विद्यार्थी व जनता भयभीत झाली आहेत. खानापूरातुन सकाळ व संध्याकाळ अशी किमान दोन वेळा तरी बस फेरीची सुविधा करावी अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देताना खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील, प्रशांत धबाले, श्रीनिवास मादार, अशोक होसमणी, जुबेर मुल्ला, विद्यार्थी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खानापूर बस आगार व्यवस्थापक महेश यांनी लागलीच निवेदनाचा स्विकार करून लवकरच भागाची आणि येथील रस्त्याची पाहणी करून त्यादृष्टीने सकाळ व संध्याकाळी बस सोडण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
Belgaum Varta Belgaum Varta