खानापूर : बेळगाव येथे स्थापन करण्यात येणार्या ग्राहक पीठाचे कलबुर्गी येथे स्थलांतर केल्याच्या निषेधार्थ खानापूर तालुका वकील संघटनेच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली. बेळगावात स्थापन करावयाच्या ग्राहक पीठाचे कलबुर्गी येथे स्थलांतर केल्याच्या निषेधार्थ बेळगावात वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरु केले आहे. खानापुरातही या आंदोलनाचे लोण पसरले. खानापूर वकील संघटनेच्या सदस्यांनी आज गुरुवारी बेळगाव-खानापूर महामार्गावर मानवी साखळी करून रास्ता रोको करून निदर्शने केली. यावेळी ग्राहक पीठ कलबुर्गीला नेल्याच्या निषेधार्थ वकिलांनी जोरदार घोषणाबाजी करून राज्य सरकारच्या धिक्कार केला.
यावेळी बोलताना खानापूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी बेळगावात सुरु करावयाचे कर्नाटक ग्राहक न्यायालयाचे संचारी पीठ दूरवर कलबुर्गीला नेल्याने पक्षकार आणि वकिलांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे सरकारने आधी ठरल्याप्रमाणे बेळगावातच ग्राहक पीठ सुरु करावे, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी ऍड. व्ही. एन. पाटील, इर्शाद नाईक, एच. एन. देसाई, इस्माईल बसरीकट्टी, सादिक नंदगडी, एम. वाय. कदम, विलास पारिशवाडकर, आय. बी. लंगोटी यांच्यासह खानापूर वकील संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
