खानापूर (विनायक कुंभार) : मलप्रभा नदीघाटाजवळ पाणी अडविण्यासाठी नवीन बंधार्याच्या बाजूला असलेल्या रुमेवाडी नाका ते मारुतीनगर या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. पाणी अडविण्याचा बंधारा भक्कम झाला असला तरी रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतूक करणे कठीण झाले आहे. जुना पूल काढून याठिकाणी येथील नदीघाटनाजीक पाणी अडविण्याच्या बंधार्याच्या पूल वजा बंधार्याची दोन वर्षांपूर्वी उभारणी करण्यात आली आहे. मात्र दोन्ही बाजूंच्या रस्त्याची अवस्था मात्र दयनीय झाली आहे. रुमेवाडी क्रॉसच्या बाजूने येणार्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने यातून मार्ग काढणे कठीण झाले आहे. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. शहराच्या बाजूने मलप्रभा नदीला आलेल्या महापुरामुळे खचलेला रस्ता दुरुस्त करण्यासाठी कोणतेच प्रयत्न घेण्यात आले नाहीत. याठिकाणी अंत्यसंस्कार व रक्षाविसर्जनासाठी बेळगावसह अनेक ठिकाणाहून लोक येत असतात. या बंधार्याच्या दुतर्फा रस्त्यांची झालेली अवस्था पाहून या रस्त्याला कोणी वाली आहे का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta