565 कोटींचा प्रकल्प
खानापूर : तालुक्यातील 135 गावांना बहुग्राम योजनेतून चोवीस तास पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. 565 कोटीच्या या योजनेची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. हि प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण होणार आहे. हि योजना 18 महिन्यात पूर्ण करून सर्व गावांना स्वच्छ पाणी पुरवठा झाला पाहिजे असे सरकारी आदेशात नमूद केले आहे, अशी माहिती आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी दिली आहे. शासकीय पातळीवर आवाज उठवून अधिकाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा मसलत करून, सतत केलेल्या पाठपुराव्याचे फलित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. येत्या दीड वर्षात ही योजना पूर्ण होऊन तालुक्यातील खेड्यांना 24 तास पाणी योजनेचा लाभ होणार आहे. तालुक्यातील एकहि गाव पाण्याविना वंचित राहणार नाही, तसेच आरोग्य आणि शिक्षण यामध्ये कोणतीही गय होऊ देणार नसल्याचे सांगितले. आरोग्य विषयाकडे प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. सरकारी दवाखान्यातील रुग्ण खाटांची संख्या वाढविणे, यासाठी शासनाची मंजुरी मिळाली आहे. तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रे अपग्रेड करणार आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहे.
जांबोटी जिल्हा पंचायत विभागातील गावांनासुध्दा अशाप्रकारची योजना मंजूर करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू केले असून योग्य वेळेत याचा खुलासा केला जाईल, असे आमदार निंबाळकर यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta