खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात साजरा होणार्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना कोविड-19 चे नियम सक्तीचे व बंधनकारक असतील कारण देशात कोरोनाच्या महामारीमुळे सार्वजनिक ठिकाणी होणार्या कार्यक्रमावर सरकारने कोविडच्या नियमाचे पालन बंंधनकारक केले आहे. त्यामुळे येणार्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोविड-19 नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे.
सार्वजनिक ठिकाणी गणेश मंडप नको, मंदिर किंवा हॉलमध्ये साधेपणाने गणेशोत्सव सरकारच्या नियमाचे पालन करत मागील वर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायचा आहे. गणेशोत्सव काळात डॉल्बी, फटाके, लाऊडस्पिकर यावर कडक बंधन घालण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी सोमवारी दि. 9 रोजी तहसील कार्यालयात बोलाविलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी वर्गाच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष मझहर खानापूरी, पोलिस निरीक्षक सुरेश सिंगे, नंदगड पोलिस निरीक्षक सत्यापा माळगौंड, उपनिरीक्षक शरमीन जाळीहोळ आदी उपस्थित होते.
तर बैठकीला खानापूर शहरातील महामंडळाचे अध्यक्ष पंडित ओगले, कार्याध्यक्ष रवि काडगी, सेक्रेटरी अमृत पाटील, खजिनदार नारायण ओगले, बाळू सावंत, नगरसेवक प्रकाश बैलूरकर, विनायक कलाल, संजू मयेकर, रमेश नाईक, अरूण चौगुले, सुनिल पारिश्वाडकर विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.