खानापूर (प्रतिनिधी) :खानापूर तालुक्यातील लोंढा, विभागात सोमवारी कर्नाटक राज्य रयत संघाच्यावतीने तहसील कार्यालयासमोर होणाऱ्या धरणे सत्याग्रह जागृती मोहीम रविवारी पार पडली.
यावेळी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना धरणे सत्याग्रहात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना राज्य रयत संघाचे उपाध्यक्ष शिवानंद मुगळीहाळ म्हणाले की, खानापूर तालुक्यातील संपूर्ण कायदा व सुव्यवस्था बिघडली असुन तालुक्यात वीज पुरवठा खंडीत होत असल्याने हेस्काॅम खाते अपयशी ठरले आहे. शेतकरी वर्गाची कर्जमाफी, अति दुर्गम व जंगल भागातील शेतकरी वर्गावर नैसर्गिक आपत्ती, जंगली प्राण्यांचा सतत धोका त्यामुळे पीके गमावली आहेत.
तालुक्यातील तरूण शासकीय गैरसोयीमुळे उपजीविकेसाठी गोवा, महाराष्ट्र राज्यात स्थलांतर होत आहेत. या समस्या मार्गी लागाव्यात. शेतकरी वर्गाचे संपूर्ण कर्ज माफ करावे. शिवाय तालुक्यातील सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार बंद व्हावा. तालुक्यातील लोकांसाठी, जनावरांसाठी वैद्यकीय विमा संरक्षण, पीक विमा या समस्या मार्गी लावण्यासाठी
तालुक्यातील शेतकरी वर्गाने, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कर्नाटक राज्य रयत संघाचे उपाध्यक्ष शिवानंद मुगळीहाळ यांनी केले. संघाचे प्रकाश नायक, माजी जिल्हा पंचायत सदस्य अशोक चलवादी, माजी तालुका पंचायत सदस्य राजू कामतगी, भाजप नेते व नंदगड ग्राम पंचायत सदस्य विजय कामत आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta