खानापूर : काळ्या दिनी उद्या दि. 1 नोव्हेंबर रोजी खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे शिवस्मारकात आयोजित निषेध सभेला मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून 1 नोव्हेंबर हा सुतक दिन म्हणून पाळावा, असे आवाहन माजी आमदार दिगंबरराव पाटील यांनी केले आहे.
1 नोव्हेंबर 1956 साली भाषावार प्रांतरचना झाली व बहुभाषिक मराठी भाग असलेला सीमाभाग कर्नाटक राज्यात समाविष्ट करण्यात आला. तेव्हापासून सीमाभागातील मराठी माणूस आपल्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहे. गेल्या 66 वर्षांपासून येथील मराठी भाषिक जनता अन्याय सहन करत आहे.
केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता लाक्षणिक उपोषण व निषेध करण्यात येणार आहे. या निषेध सभेला मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जेष्ठ सीमासत्याग्रही पुंडलिक चव्हाण यांनी केले आहे.
त्यानंतर समिती बळकट करण्यासाठी संघटनेची पुढील वाटचाल व विभागावर बैठका घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, प्रवीण पाटील, यशवंत बिर्जे, बाळासाहेब शेलार, महादेव घाडी, शिवाजी पाटील आदींनी विविध विषयांवर आपली मते मांडली. अनेक सूचना देखील करण्यात आल्या. यावेळी कार्यकर्त्यांच्या सूचनांचा 1 नोव्हेंबरनंतर विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी सांगितले. त्यानंतर ग्रंथदिंडी यशस्वी केल्याबद्दल कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात आले.
बैठकीनंतर शिवस्मारकापासून स्टेशन रोड, चिरमुरकर गल्ली बाजारपेठ आदी भागातून पत्रके वाटून काळ्या दिनाची जागृती करण्यात आली.
आबासाहेब दळवी यांनी बैठकीचा उद्देश सांगत प्रास्ताविक व स्वागत केले.
यावेळी माऱ्याप्पा पाटील, ईश्वर बोबाटे, प्रल्हाद मादार, नारायण लाड, विठ्ठल गुरव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta