खानापूर : तालुका म. ए. समितीचे दोन्ही गट एकत्रित काळा दिन पाळणार आहेत. शिवस्मारक येथे आज निषेध सभा व लाक्षणिक उपोषण करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.
दि. 30 नोव्हेंबर रोजी गर्लगुंजी येथे कब्बडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी खानापूर समितीचे दोन्ही गट एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. त्यावेळी गर्लगुंजी येथील माऊली ग्रुपने दोन्ही गटांना पुन्हा एकदा एकीची साद घातली. आयोजकांनी प्रास्ताविक करत असतानाच दोन्ही गटांना उद्देशून सांगितले की, आम्ही बक्षिसे किव्हा देणगी जमा करण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन केलेलं नाही तर विखुरलेली समिती एकत्रित आणण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत एकी ही झालीच पाहिजे असा आग्रह यावेळी माऊली ग्रुपने धरला व समितीप्रति असलेली आपली निष्ठा दाखवून दिली आहे.
समितीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गर्लगुंजी गावातून पुन्हा एकदा एकीच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे असेच म्हणावे लागेल. यावेळी दोन्ही गटाच्या नेत्यांनी एकीचे समर्थन करत एकीसाठी आजपर्यंत काय काय प्रयत्न केलेत याचे स्पष्टीकरण देण्यात आले.
यावेळी बाळासाहेब शेलार, यशवंत बिर्जे,?निरंजन सरदेसाई, सुरेश देसाई, गोपाळ देसाई, मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, गोपाळ पाटील, धनंजय पाटील,/राजू पाटील यांच्यासह इतर कार्यकर्त्यांची भाषणे झाली. त्यानंतर प्रमुख वक्ते पांडुरंग सावंत यांचे भाषण झाले. अध्यक्षीय भाषणात हणमंत मेलगे यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत एकी ही झालीच पाहिजे. यासाठी आज प्रत्येकाने गर्लगुंजीचे ग्रामदैवत असलेल्या माऊली देवीच्या साक्षीने शपथ घेतली व एकीचे समर्थन केले. माऊली ग्रुपच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुरलीधर पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आपल्या गटाकडून एकीचे सर्वाधिकार आम्ही माऊली ग्रुपला देत आहोत. माऊली ग्रुपने प्रयत्न करून विनाआट एकी करावी. यावेळी सर्वपदे रिक्त करून विनाअट एकी करूया असे माऊली ग्रुपकडून सांगण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta