केवळ सहा महिन्यासाठी नूतन नगराध्यक्ष
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या राजीनाम्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून नगरसेवकांतून संघर्ष होता.
अखेर शुक्रवारी दि. 4 रोजी नगराध्यक्ष मजहर खानापूरी यानी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा प्रांताधिकारी बलराम चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. दि. 4 नोव्हेंबर 2020 रोजी मजहर खानापूरी यांनी नगराध्यक्ष पदाचा भार स्विकारला होता. त्यावेळी नगराध्यक्ष पद सामान्यांसाठी खुले होते. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी इच्छूकांची संख्या अधिक होती. मात्र माजी नगराध्यक्ष रफिक खानापूरी यांचे अकस्मात निधन झाले. त्यामुळे सहानुभूती दर्शवून व माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या आदेशानुसार नगराध्यक्ष पदाची माळ मजहर खानापूरी यांच्या गळ्यात पडली. परंतु वर्षभरात नगरसेवकांतून गटबाजी निर्माण झाली. एका गटाकडून नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांच्यावर अविश्वासाचा ठराव दाखवत दोन वर्षांत नगराध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न सुरू झाला. शेवटी माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी पुढाकार घेऊन व नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांनी स्वत:हून आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा प्रांताधिकारी बलराम चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला.
आता केवळ सहा महिन्यासाठी नूतन नगराध्यक्ष कोण होणार याकडे खानापूर नगरवासीयांचे लक्ष लागून आहे. यावेळी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीसाठी नगरसेवक व स्थायी समिती चेअरमन प्रकाश बैलूरकर, नगरसेवक नारायण मयेकर यांच्यासह इतर नगरसेवकही इच्छूक आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta