Wednesday , December 10 2025
Breaking News

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; पंचगंगा पाणी पातळी 31 फुटांवर

Spread the love

कोल्हापूर : सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पंचगंगेला मंगळवारी पूर आला. पंचगंगेचे पाणी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पात्राबाहेर पडले. पाणी पातळीत वेगाने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार ‘एनडीआरएफ’च्या दोन तुकड्या मंगळवारी रात्री दाखल झाल्या. त्यापैकी एक कोल्हापुरात, तर एक शिरोळ तालुक्यात तैनात करण्यात येणार आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी 9 वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फूट इतकी होती. तर 29 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदी इशारा पातळी 39 फूट 3 इंच व धोका पातळी 43 फूट आहे.
दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी तातडीची बैठक घेऊन सर्व यंत्रणांना सज्जतेचे आदेश दिले. पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिक आणि जनावरांचे स्थलांतर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. शुक्रवारपर्यंत (दि. 8) जिल्ह्यात अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पंचगंगेची पातळीत वाढ
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. काही काळ पावसाने विश्रांती घेतली; मात्र रात्री पावसाचा जोर पुन्हा वाढला. यामुळे नद्यांच्या आणि धरणांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ सुरू आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता 15 फुटांवर असलेली पंचगंगेची पातळी मंगळवारी सकाळी 24 फुटांवर गेली होती. बुधवारी राजाराम बंधारी पाणी पातळी 30 फुटांवर गेली. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले होते.

जनजीवन विस्कळीत
शहर आणि परिसरात दिवसभर पाऊस सुरू होता. पावसाने जनजीवनावर परिणाम झाला. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा होत्या. संथगतीने वाहने पुढे जात होती. शहराच्या काही भागांत रस्त्यावर पाणी साचले होते. पावसाने बाजारपेठा, दुकानांसह शासकीय कार्यालयांतील उपस्थितीवरही परिणाम झाला होता.

29 बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, सुर्वे आणि तेरवाड हे आणखी तीन बंधारे पाण्याखाली गेले. शिंगणापूर बंधारा पाण्याखाली गेल्याने शिंगणापूर ते चिखली या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. भोगावती नदीवरील हळदी आणि कोगे, कासारी नदीवरील वाळोली, यवलूज, पुनाळ-तिरपण, ठाणे-आळवे, बाजारभोगाव, तर कुंभी नदीवरील मांडुकली, शेणवडे, पेंडागळे, काटे, कुंथीवाडी, करंजफेण, कुंभी हे बंधारे पाण्याखाली गेल्याने त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

इचलकरंजी-शिरढोण मार्गावर पाणी
तुळशी नदीवरील बीड तसेच धामणी नदीवरील आंबार्डे बंधारा पाण्याखाली गेला आहे. इचलकरंजी-शिरढोण या मार्गावर पाणी आल्याने या मार्गावरील एस.टी. वाहतूक बंद करण्यात आली आहे. शाहूवाडी तालुक्यातील बर्की गावाचा संपर्क तुटला आहे.

एसएमएसद्वारे नागरिकांना सूचना
राज्यात सर्वात प्रभावी ठरलेल्या पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीमद्वारे मंगळवारी जिल्ह्यातील नागरिकांना पुराबाबत अलर्ट देण्यात आला. याद्वारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीची माहिती नागरिकांना दिली. यावर्षीपासून सुरू केलेल्या व्हॉटस् अ‍ॅप अलर्ट सिस्टीमद्वारेही नागरिकांना माहिती देण्यात आली. जिल्हा प्रशासन व राज्य शासनाच्या वतीने हवामान विभागाच्या अंदाजाचा संदेश हजारो नागरिकांच्या मोबाईलवर पाठविण्यात आला.

कर्नाटक प्रशासनाशी सातत्याने समन्वय : जिल्हाधिकारी
अलमट्टी धरणातील पाणी विसर्गाबाबत कर्नाटकशी सातत्याने समन्वय सुरू आहे. कर्नाटक प्रशासनही सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले. जिल्ह्यात दि. 8 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस होणार आहे. यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. नदीकाठावरील, सखल भागातील नागरिकांनी तसेच ज्या-ज्या ठिकाणी पाणी येते, त्या परिसरातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, योग्यवेळी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पंचगंगेच्या पातळीत दोन दिवसांत 14 फुटांनी वाढ
पंचगंगेच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासांत दहा फुटांनी वाढ झाली. सोमवारी सकाळी पंचगंगेची पातळी 15 फुटांवर होती. मंगळवारी सकाळी ती 24.5 फुटांपर्यंत गेली. यानंतर दिवसभरात पाणी पातळीत चार फुटांनी वाढ झाली. दिवसभरात दर दोन तासाला सरासरी अर्धा फुटाने पाणी वाढत होते. रात्री नऊ वाजता पाणी पातळी 27.9 फुटांपर्यंत गेली होती. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट असून, धोका पातळी 43 फूट आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास दोन दिवसांत पंचगंगा इशारा पातळी गाठण्याची भीती आहे.

‘एनडीआरएफ’च्या दोन तुकड्या दाखल
‘एनडीआरएफ’च्या 2 तुकड्या जिल्ह्यात मंगळवारी रात्री नऊ वाजता दाखल झाल्या. एक तुकडी शिरोळकडे रवाना झाली असून, दुसरी तुकडी कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या तुकडीचे प्रमुख व जवानांची भेट घेऊन बचाव व मदत कार्याच्या अनुषंगाने चर्चा केली. यावेळी निरीक्षक बृजेशकुमार रैकवार, शरद पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *