कोल्हापूर (जिमाका) : सध्या बदलत्या हवामानामुळे शेती तोट्याची ठरत आहे त्यामुळे जगाचा पोशिंदा संकटात आहे. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रात नव नवीन प्रयोग करावेत, तसेच कृषी विषयक अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन स्वत:ची आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
राधानगरी तालुक्यातील राशिवडे बु. या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा कृषि महोत्सवाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कृषि आयुक्तालय (पुणे) आत्माचे संचालक दशरथ तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी जालिंदर पांगरे, रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, राशिवडेच्या सरपंच संजिवनी पाटील आदी उपस्थित होते.
श्री. केसरकर पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी केवळ भात, ऊस शेतीवर अवलंबून न राहता इतर पिके घेण्याबाबत नियोजन करावे. शेतकऱ्यांनी कृषि पूरक जोडधंदा करावा. त्याचबरोबर दुबार व आंतर पिके घेण्याला प्राधान्य द्यावे. मॉडेल रुपाने राधानगरी कृषि पर्यटन म्हणून विकसित व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. राधानगरी धरण परिसरात 50 वूडन कॉटेजची उभारणी करण्यात यावी. त्याचबरोबर डबल डेकर बोट घेवून धरण परिसरातील पर्यटनाला चालना द्यावी. याकरिता जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करावा, असे निर्देश देवून राशिवडे बु. गावच्या विकासाकरीता सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी देवू अशी घोषणा केली.
खा. श्री. मंडलिक म्हणाले, शेती करताना शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाचा जरुर विचार करावा. त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेचाही विचार करावा. शास्त्रोक्त शेती करण्याला प्राधान्य द्यावे. पारंपारिक पिके न घेता नव नवीन पिक उत्पादने घेण्याला प्राधान्य द्यावे. तर आ. आबिटकर म्हणाले, शेतकऱ्यांनी शेतीचे सुयोग्य व्यवस्थापन आत्मसात करावे. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी. शेती पूरक व्यवसायाकडे लक्ष द्यावे. शासनाच्या कृषि विषयक योजनांचा लाभ घ्यावा. सेंद्रीय शेतीसाठी शासनाने शेतकऱ्यांकरीता भरीव निधीची तरतुद केली असून त्याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी 30 मार्चपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचा केवळ शेतकऱ्यांनीच नाही तर सामान्य जनतेनेही याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांच्यावतीने एकूण 15 लाभार्थ्यांना अनुदान योजना म्हणून प्रत्येकी 10 हजार रुपयांचा तर बीज भांडवल 1 लाभार्थ्याला 52 हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते देण्यात आला.
दिनांक 30 मार्चपर्यंत चालणाऱ्या या कृषि महोत्सवात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषि महोत्सवात सुमारे 200 स्टॉलची उभारणी करण्यात आली असून यामध्ये विविध महिला बचत गट, कृषि विषयक अवजारे स्टॉल, विविध शासकीय स्टॉल तसेच पशु प्रदर्शन आदींचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दशरथ तांभाळे यांनी केले तर आभार जालिंदर पांगरे यांनी मानले. यावेळी तहसिलदार श्रीमती निंबाळकर यांच्यासह सर्व तालुका कृषि अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.