राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाची सुरुवात
कोल्हापूर (जिमाका) : फुलांच्या पाकळ्यांनी घातलेल्या पायघड्या.. ठिकठिकाणी काढलेल्या रंगीबेरंगी रांगोळ्या.. चित्तथरारक व रोमांचकारी मर्दानी खेळ आणि ढोल-ताशांचा गजरात छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती ताराराणी महाराणी की जय! राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय! अशा घोषणांनी दुमदुमणारा आवाज आणि अभूतपूर्व उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज व करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराराणी यांचा रथोत्सव पार पडला..
राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त ’लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाला’ सोमवारी भवानी मंडपातून रथोत्सवाने सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज व करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराराणी यांचा रथोत्सव ढोल ताशांच्या गजरात शाही लवाजम्यासह संपन्न झाला. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांसह पालकमंत्री सतेज पाटील यांनी रथ ओढून रथोत्सवाला प्रारंभ झाला. पारंपरिक लवाजम्यासह हा रथ भाविकांनी ओढून मार्गस्थ केला.. यावेळी आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीने हा अविस्मरणीय रथोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. भवानी मंडप- महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल- मिरजकर तिकटी- बिनखांबी गणेश मंदिर- महाद्वार रस्ता- महाद्वार चौकात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराकडून पुढे- गुजरी – भाऊसिंगजी रस्ता- नगारखाना मार्गे पुन्हा भवानी मंडप मार्गाने रथोत्सव संपन्न झाला. अभूतपूर्व उत्साहात साजरा झालेल्या रथावर पुष्पवृष्टीही करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा अभिमान आणि त्यांच्या कार्याचा वारसा आपल्या प्रजेतही रुजावा व वाढावा यासाठी शिवराय आणि महाराणी ताराराणी या देवतुल्य व्यक्तिमत्वांच्या समारंभांना धार्मिक उत्सवाचे स्वरूप देऊन 1914 साली राजर्षी शाहू महाराजांनी रथोत्सव केला. जोतिबा यात्रेनंतर दुसर्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा रथोत्सव संपन्न होतो. याच रथोत्सवाच्या दुसर्या दिवशी शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी यांचा रथोत्सव सुरु केला. कै. नानासाहेब यादव यांनी सांगितलेल्या आठवणी नुसार हा रथोत्सव म्हणजे फक्त एक धार्मिक सोहळा नव्हता, तर करवीर संस्थानचे एक लष्करी संचलनच असायचे. सर्व शाही लवाजम्यासह होणारा हा रथोत्सव करवीरनिवासिनीच्या रथाच्या मार्गानेच होत असे.