Monday , December 8 2025
Breaking News

संभाजीराजे महाविकास आघाडीसोबत राहण्याची शक्यता; काँग्रेस की शिवसेना याचा लवकरच फैसला

Spread the love


कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करत राज्यभर चर्चेत आलेले संभाजीराजे छत्रपती यांची नवी राजकीय इनिंग लवकरच सुरू होणार आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत 3 मे रोजी संपल्याने त्यांची नवी राजकीय वाटचाल महाविकास आघाडीच्या दिशेने होण्याचे संकेत आहेत. मात्र, यामध्येही शिवसेना की काँग्रेस यांचा फैसला होण्यास विलंब लागण्याची चिन्हे आहेत.
थेट लोकसभा निवडणूक लढवत कोल्हापूरच्या राजकारणात प्रवेश केलेल्या संभाजीराजेंनी पराभवानंतर राजकारणापासून थोडी अलिप्तता स्वीकारली. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी होत राज्यभर आपला दबदबा तयार केला. यामुळे बहुजन चेहरा आपल्या पक्षात असावा म्हणून भाजपने त्यांना थेट राष्ट्रपती नियुक्त खासदार केले. पण सहा वर्षात संभाजीराजेंनी या पक्षाच्या व्यासपीठावर जाण्याचे टाळले. स्वीकृत सदस्य होवूनही पक्षाचे काम केले नाही. यामुळे भाजपमध्ये त्यांच्याविषयी अंतर्गत नाराजी निर्माण झाली.
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मराठा आरक्षणाच्या विषयावर ते रान पेटवतील आणि त्याचा फायदा भाजपला होईल अशी या पक्षाची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. यामुळे भाजपचे नेतेही निराश झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी अतिशय स्नेहाचे संबंध राहिले, मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत त्यांनी पुढील राजकीय वाटचाल या पक्षाबरोबर नाही हेच स्पष्ट केले.
राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत मंगळवारी संपली. ती संपल्यानंतर आपण पुढील राजकीय वाटचालीची घोषणा करू असे त्यांनी जाहीर केले होते. मध्यंतरी ते नवीन पक्ष स्थापन करतील अशी चर्चा होती. पण सध्याच्या राजकारणात असा निर्णय ते घेण्याची शक्यता दिसत नाही. यामुळे त्यांची पसंती महाविकास आघाडीतीलच एका पक्षाला मिळण्याची चिन्हे आहेत.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांना काँग्रेस प्रवेशाचे आमंत्रण दिले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी राजघराण्याचे अतिशय सलोख्याचे संबंध आहेत, त्यामुळे तो पक्षही त्यांना आमंत्रित करू शकतो. अलिकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही राजेंनी स्नेह वाढवला आहे. यामुळे महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षात ते जाण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत तीनही पक्षाना मान्य होणारे ते उमेदवार ठरू शकतात. त्यामुळे ती निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच ते पुढील निर्णय घेण्याची शक्यता आहे.
संभाजीराजेंचे सूचक ट्विट
छत्रपती संभाजीराजे यांची राज्यसभा खासदारकीची मुदत संपल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्विटर फोटो पोस्ट करीत एक सूचक इशारा दिलेला आहे. या फोटोमध्ये संभाजीराजे हे छत्रपती शाहू महाराजांचे पुस्तक वाचताना दिसत असून मागे छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराज, संभाजीराजे यांचे आजोबा मेजर जनरल छत्रपती शहाजी महाराज व वडील विद्यमान छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमा या फोटोमध्ये दिसत आहेत. या फोटो सोबत संभाजीराजे यांनी आजन्म विचारांशी बांधील असेही म्हटले आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजे काँग्रेसमध्ये यावेत, अशी इच्छा जाहीररित्या व्यक्त केली. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे हे ट्विट त्यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल, याचा एक सूचक अंदाज देणारे आहे. त्यांचे बंधू माजी आमदार मालोजीराजे हे काँग्रेसमध्ये सक्रीय झाल्याने संभाजीराजेही त्याच मार्गाने जाण्याची शक्यता बळावली आहे.

About Belgaum Varta

Check Also

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांकडून डॉक्टरांची झाडाझडती, निलंबनाचे आदेश…

Spread the love  कोल्हापूर : काल ठाकरे शिवसेने नेते कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयातील अव्यवस्थेवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *