विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या सूचना
कोल्हापूर (जिमाका) : यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य पूर परिस्थती उद्भवल्यास याचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावे. शहरी व ग्रामीण भागातील नागरी वस्तीमधील पुराच्या पाण्याचा निचरा लवकरात लवकर होण्यासाठी मुंबईच्या धरतीवर पंपिंग स्टेशन सुरु करता येतील याचा विचार होऊन यासाठी नियोजन करावे, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी आज येथे दिल्या.
मान्सून पूर्व तयारीचा आढावा व संभाव्य पूर परिस्थती उपाय योजनांबाबत उपसभापती निलम गोऱ्हे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. बैठकीस खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, जिल्हा शल्य चिकित्सव डॉ. अनिल माळी, जिल्हा आपत्ती व्यस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, कोल्हापूर जिल्हा हा पूर प्रवण जिल्हा आहे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी ओढे, नाले साफसफाई करुन नैसर्गिरित्या पाणी जाण्याचा मार्ग मोकळे करावेत. या कामासाठी यंत्रणांनी प्राधान्य देऊन कालमर्यादा ठरविण्यात यावी. याबरोबच नाल्याच्या काठावर अवैध बांधकामे होणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी. पूर परिस्थिती उद्भवल्यास या कालावधीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद होणार नाही, याबाबत आतापासूनच नियोजन करावे, अशा सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.
पुरामुळे नुकसान झालेल्यांना शासनामार्फत देण्यात आलेल्या मदतीचाही आढावा उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी बैठकीत घेतला. प्राप्त निधी संबंधित पूरग्रस्तांना देण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थितीत स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, मंडळांमार्फत चांगले उपक्रम राबविले जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पूर परिस्थतीत शेतकऱ्यांच्या जनावरांना दावणीला चारा देता येईल का याबाबत लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.
पुरामुळे रस्त्यांचे नुकसान होऊ नये, रस्त्यावर पाणी साचून राहू नये यासाठी अशा रस्त्यांवर पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याखालून पाईपलाईन टाकण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केल्या. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी जिल्ह्यातील धरणातील पाणी साठा, पाऊसमान, आपत्तीमध्ये उपलब्ध साधन सामग्री, राधानगरी धरण दरवाजे याबाबत सविस्तर आढावा घेतला. राधानगरी धरण दरवाजाबाबत कालबद्ध कार्यक्रम ठरवावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्ह्यातील धरणामध्ये 86 टीएमसी पाणी साठा होत असून पावसाळ्यात 24 तास पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित असल्याचे अधीक्षक अभियंता श्री. सुर्वे यांनी सांगितले. तसेच धरण क्षेत्रातील पाऊस, धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग याबाबतची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, तालुका व ग्रामस्तरापर्यंत जलसंपदा विभागामार्फत त्वरीत पोहचविली जात असून ही माहिती www.rtsfros.com/RTDAS या संकेतस्थळावर दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
शाश्वत विकास उदिष्टामध्ये जिल्ह्याचा एकत्रित प्रस्ताव द्या. शाश्वत विकासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. यामध्ये समाविष्ट असणाऱ्या बाबींचा एकत्रित प्रस्ताव पाठण्याच्या सूचना करुन उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, प्रस्ताव तयार करताना संबंधित लोकप्रतिनिधींची मते जाणून घ्यावीत. समाजाभिमुख काम होण्यासाठी यामध्ये जलसंधारण, घनकचरा, वैद्यकीय कचरा, पाणीटंचाई, प्रदूषण, नागरी वने याबाबतचा समावेशही असावा.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, संभाव्य पूर परिस्थितीचा समर्थ मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाय योजना सुरु केल्या आहेत. पूर परिस्थिती उदभवल्यास 1 हजार स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये 500 युवतींचाही सहभाग आहे. बोटींची उपलब्धता असून जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष वर्षभर 24 तास कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. उपसभपती महोदयांनी दिलेल्या सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आपआपल्या विभागाचे कामकाज पूर्ण करुन याबाबतचा अहवला सादर करावा, अशा सूचना त्यांनी जिल्ह्यातील यंत्रणांना दिल्या.
जिल्ह्यातील कार्यान्विन यंत्रणांना उपसभपती महोदयांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी उपसभापती महोदयांचे आभार मानले.