प्राथमिक लघुग्रह शोधण्यात यश : तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
निपाणी (संजय सुर्यवंशी) : नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल एस्ट्रोनोमिकल सर्च कोलॅबरेशन नासा, विपनेट क्लब विज्ञान प्रसार आणि सप्तऋषी विपनेट कॅम्प इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिम व पृथ्वीच्या कक्षेतील ऑब्जेक्ट सर्च कॅम्प 03 ते 28 मे 2021 अखेर झाला. या कॅम्पमध्ये खगोल शास्त्रज्ञ डॉ. अरविंद रानडे विज्ञान प्रसार नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली 43 प्राथमिक लघुग्रह शोधण्यात यश आले. या शोध मोहिम कॅम्पमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधी म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या सिद्धेश्वर विद्यालय कुर्ली येथील सर सी व्ही रामन विपनेट क्लबचे संयोजक एस. एस. चौगुले यांनी सप्तऋषी विपनेट कॅम्प 03 मधून सहभाग घेतला. प्राथमिक लघुग्रह शोधण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यामुळे निपाणी तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
चौगुले यांनी विपिन रावत- विज्ञान प्रसार नवी दिल्ली, अमृतांशू वाजपेयी-संयोजक सप्तऋषी विपनेट कॅम्प फारूकाबाद, तुषार पुरोहित-आयुका पुणे, यांच्याकडून लघुग्रह शोध मोहिम, एस्ट्रोमेट्रीका सॉफ्टवेअर, इमेज विश्लेषण आणि एमपीसी रिपोर्ट याबाबत दोन महिने ऑनलाइनव्दारे प्रयोगिक प्रशिक्षण घेतले. संजय सोनार-महाराष्ट्र, निरंजन बोहरा व झांशी राणी साहू – ओडिसा यांच्यासमवेत एस. एस. चौगुले यांनी या कॅम्पमध्ये 250 हून अधिक फोटोंचे विश्लेषण करून एमपीसी रिपोर्ट तयार केले. यामध्ये चौगुले यांनी एक प्राथमिक लघुग्रह शोधला असून त्याला झ11षट30 असे नामकरण करण्यात आले आहे. याबाबत ईमेलद्वारे इंटरनॅशनल एस्ट्रोईड सर्च कॅम्प (खअडउ) नासा, यांनी कळविले आहे. डॉ. रिचर्ड विनस्कोट पॅन स्टार इन्स्टिट्यूट फॉर एस्ट्रोनोमी, युनिव्हर्सिटी ऑफ हवाई आणि डॉ पॅटरिक मिलर इंटरनॅशनल एस्ट्रोनोमिकल सर्च कोलॅबरेशन हर्डीन सिमन्स युनिव्हर्सिटी यांनी प्रमाणपत्र पाठविले आहे.
या संशोधन कार्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव संजय नागपुरे, विभागीय अधिकारी के. बी. मालुसरे, चिक्कोडी जिल्हा उपनिर्देशक गजानन मन्नेकेरी, डायट प्राचार्य मोहन जिरगिहाळ, निपाणी गटशिक्षणाधिकारी रेवती मठद, मुख्याध्यापक बी. एस. पाटील, स्कूल कमिटी व स्कूल बेटरमेंट कमिटी सदस्य यांनी चौगुले यांचे अभिनंदन केले.
