Sunday , October 13 2024
Breaking News

उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन; सत्ताधारी आणि विरोधकांची खलबतं

Spread the love

मुंबई : उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होतं आहे. यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार हे नक्की आहे. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारच्या कारभारावरून आणि नेत्यांवरच्या आरोपांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची चिन्हं आहेत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज भाजप नेत्यांची दुपारी बैठक आहे. यात अधिवेशनातल्या रणनीतीवर खलबतं होणार असल्याची माहिती मिळत आहे.
राज्याचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून (बुधवार) सुरु होत असून, हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. आधीच नागपूरमध्ये न होणारे हिवाळी अधिवेशन आणि अधिवेशनाचा कमी कालावधी यामुळे विरोधक आक्रमक आहेत. त्यातच ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामुळे ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे. याचसोबत टीईटी परीक्षा घोटाळा, म्हाडा पेपर फुटी प्रकरण यासारख्या मुद्यावरून भाजप अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसांपासून सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. भाजपने आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली असून, अधिवेशनात सत्ताधार्‍यांना घेरण्याचा मास्टर प्लॅन भाजप आखत आहे. कमी कालावधीचे अधिवेशन असले तरी या अधिवेशनात सरकारची कोंडी करण्यासाठी भाजप रणनीती आखत आहे.
22 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान अधिवेशन
यंदाच्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 22 डिसेंबरला सुरुवात होणार आहे. 22 ते 28 डिसेंबर या दरम्यान हे अधिवेशन होणार आहे. कार्यकाळ जरी सात दिवासांचा वाटत असला तरी शनिवार आणि रविवारमुळे हे अधिवेशन अवघ्या पाचच दिवसांचं असणार आहे. हे अधिवेशन अधिक वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जातेय. सध्या विविध मुद्यांवरुन राज्य सरकार विरुद्ध विरोधक असा जोरदार सामना सुरु आहे. अशातच आता पुन्हा एकदा सभागृहात ठाकरे आणि फडणवीस आमने-सामने येणार आहेत.
अधिवेशनात विरोधकांची सरकारला घेरण्याची तयारी
सध्या राज्यात एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरु आहे. अद्याप यावर काही तोडगा निघालेला नाही. या मुद्यांवरुन विरोधक सरकारला चांगलेच धारेवर धरण्याची शक्यता आहे. तसेच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देखील सध्या जोरदार चर्चेत आहे. या अधिवेशनात ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून सर्वच पक्ष एकमेकांना भिडणार आहेत. या मुद्द्यावरून राजकीय राडा बघायला मिळू शकतो. तसेच आरोग्य विभाग असो किंवा म्हाडाची परिक्षा किंवा एमपीएससीची परीक्षा या परीक्षांमध्ये सातत्याने घोळ झालेला पाहायला मिळतो. हा मुद्दाही अधिवेशनात गाजणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांची निवडीवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. या सर्व मुद्यांवरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात सामना रंगणार आहे.
बंगळूरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. हा मुद्दा महाविकास आघाडी सरकारनं चांगलाच उचलून धरला आहे. या मुद्यावरुन सत्ताधारी भाजपवर निशाणा साधण्याची शक्यता आहे. कारण सध्या कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे. तसेच या घटनेबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनीदेखील वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे विरोधक सत्ताधार्‍यांवर भारी पडण्याआधीच सत्ताधारी विरोधकांवर भारी पडले आहेत. त्यामुळे यंदाच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी सभागृह दुमदुमणार आहे.
दरम्यान, सध्या राज्यावर ओमायक्रॅानचे संकंट घोंगावत आहे, यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी काँग्रेस आग्रही असणार आहे. नुकत्याच विधानपरिषदेत काही ठिकाणी झालेला महाविकास आघाडीचा पराभव सरकारला चिंतेत टाकणार आहे. याआधी अनिल देशमुख आणि संजय राठोडसारख्या दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत, आगामी काळात कोणाचा नंबर लागणार? याचीही चर्चा सुरु आहे.

About Belgaum Varta

Check Also

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर

Spread the love  मुंबई : दिल्लीत पार पडणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *