मुख्यमंत्री बसवराज बोम्माईंच्या ‘त्या’ विधानामुळे तर्क-वितर्काला उधाण!
बेंगळुरू : काही महिन्यांपूर्वीच कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी हाती घेतलेल्या बसवराज बोम्माई यांची पदावरून उचलबांगडी होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. 28 जुलै रोजी बसवराज बोम्माई यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या उचलबांगडीनंतर मुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारली होती. मात्र, आता पुन्हा एकदा कर्नाटकात नेतृत्वबदलाची चर्चा सुरू झाली आहे. त्यांचा मतदारसंघ असलेल्या शिग्गावमध्ये बोलताना बसवराज बोम्माई यांनी केलेल्या एका विधानावरून जोरदार चर्चा सुरू झाली असून कर्नाटकमध्ये 5 महिन्यांत पुन्हा एकदा नेतृत्वबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मी नेहमीच म्हणत आलोय की शिग्गावच्या बाहेर मी याआधी गृहमंत्री आणि जलसिंचन मंत्री होतो. पण एकदा का मी इथे आलो, मी तुम्हा सर्वांसाठी बसवराजच आहे. आजही मी बाहेरच्या जगासाठी मुख्यमंत्री असेनही, पण तुमच्यामध्ये मी तोच बसवराज बोम्माई राहीन. कारण बसवराज हे नाव कायमस्वरूपी आहे, हे पद कायम राहणार नाही, असं ते म्हणाले.
जगात काहीही शाश्वत नाही
दरम्यान, यावेळी बोलताना बोम्माई यांनी केलेल्या विधानावरून चर्चा सुरू झाली आहे. या जगात काहीही शाश्वत नाही. हे आयुष्य सुद्धा कायमस्वरूपी राहणार नाही. आपल्याला माहिती नाही, की या परिस्थितीत आपण किती काळ राहू. हे पद, ही प्रतिष्ठा देखील चिरकाळ टिकणारी नाही. मला प्रत्येक क्षणी या वास्तवाची जाणीव असते, असं बोम्माई म्हणाले आहेत. यावेळी बोलताना बोम्माई भावूक झाल्याचं देखील दिसून आलं.
गेल्या काही दिवसांपासून बसवराज बोम्माई यांना पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या कार्यकाळात भाजपाची स्थानिक निवडणुकांमध्ये खालावलेली कामगिरी, भ्रष्टाचाराचे आरोप, लोकांचे नेते म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यात आलेलं अपयश, जनतेशी तुटलेला संबंध अशा अनेक गोष्टींवर चर्चा सुरू असून त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर पद सोडण्यासाठी दबाव असल्याचं देखील बोललं जात आहे.
दरम्यान, भाजपाकडून मात्र या सर्व शक्यता फेटाळून लावण्यात आल्या असून बोम्माई त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.