मुंबई : बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रकार घडल्यानंतर बेळगावसहीत सीमाभागांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने आंदोलन केलं. मात्र या आंदोलनानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्यासंदर्भात कर्नाटक सरकार विचार करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. असं असतानाच यासंदर्भात शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी लोकांचा आवाज दाबून हुकूमशाहीची बिजं रोवली जात असतील तर महाराष्ट्र गप्प बसणार नाही असं सांगतानाच कर्नाटक सरकारने बंदी घालून दाखवावीच असं थेट आव्हान दिलं आहे.
दिल्लीच्या संसदेमध्ये किंवा राष्ट्रीय स्तरावर एक पक्षीय हुकूमशाही सुरु आहे. यामुळे आमचे 12 खासदारही निलंबित केलेत. आम्ही ती लढाई लढतोय, असं राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं. पुढे बोलताना, भाजपाशासित राज्यामध्येसुद्धा अशाप्रकारे लोकांचा आवाज दाबून हुकूमशाहीची बिजं रोवली जाणार असेल तर महाराष्ट्र गप्प बसणार नाही, असंही राऊत म्हणाले.
महाराष्ट्र एकीकरण समिती ही राजकीय संघटना नाही. सीमा भागातील मराठी बांधवांचा आवाज, त्यांचा संघर्ष आणि त्यांचं प्रतिनिधित्व महाराष्ट्र एकीकरण समिती मागील 70 वर्षांपासून करतेय. त्यासाठी त्यांनी रक्त सांडलं आहे. बलिदानं दिलेली आहेत. तिथे 20 लाखांच्या वर मराठी बांधव आहेत. ही सामन्य ताकद नाहीय, असंही राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीबद्दल बोलताना सांगितलं.
बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची वारंवार विटंबना होतेय. त्याच्याविषयी देशभरामध्ये संताप आहे. बेळगावमधील सीमाभागातील लोकांनी आंदोलन करुन संताप व्यक्त केला. त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केलं. कायदा हातात घेतला असेल तर कर्नाटक सरकारने कारवाई करावी. मात्र मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 200 हून अधिक कार्यकर्त्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर पोलीस बेदम लाठीमार करतायत, डोकी फोडतायत त्यावर महाराष्ट्रातील भाजपाचे संवेदनशील नेते काय करतायत?, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.
एकीकरण समितीवर बंदीची भाषा ही बोलण्यापर्यंत ठीक आहे. पण त्यांनी बंदी घालून दाखवावी, असं थेट आव्हानच राऊत यांनी कर्नाटक सरकारला दिलं आहे.
केंद्राची यासंदर्भातील भूमिका ढोंगी आणि दुटप्पीपणाची आहे. वाराणसीला जाऊन हिंदू मतदरांना आर्षित करण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी, पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ दिला. पण त्या छत्रपतींचा अपमान भाजपाशासित राज्यात झाला त्याबद्दल एकही केंद्रीय मंत्री बोलत नाही हे ढोंग आहे, असंही राऊत म्हणालेत.
Check Also
मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब; एकनाथ शिंदेंचा गृहमंत्रिपदासह तब्बल 12 मंत्रिपदावर दावा
Spread the love नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदावरुन रंगलेले राजकारण संपता संपत नसल्याचे पाहायला …