निवडणुकीतील चुरस वाढणार, घोडेबाजाराची शक्यता
मुंबई : सुरुवातीला एकतर्फी वाटणारी राज्यसभेची निवडणूक आता रंगतदार होण्याची शक्यता आहे. भाजपने आपले दोन उमेदवार जाहीर केले असून सोमवारी कोल्हापूरच्या धनंजय महाडिकांना मुंबईत येण्याचा संदेश पाठवला आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपकडून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. असं जर झालं तर या निवडणुकीत घोडेबाजार अटळ असल्याचं स्पष्ट आहे.
सहा जागेसाठी सात उमेदवार
महाराष्ट्रातून यावेळी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एक जागा लढणार आहेत. आतापर्यंत शिवसेनेने दोन तर भाजपने दोन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतरही कोल्हापूरच्या धनंजय महाडिकांना उद्या मुंबईत या असा संदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्याने त्यांचाही अर्ज भाजपच्या वतीने दाखल होण्याची शक्यता आहेत. असं जर झालं तर सहाव्या जागेसाठी चुरशीची लढत पहायला मिळेल.
धनंजय महाडिक हे माजी खासदार आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर ते 2014 साली निवडून आले होते. 2019 सालच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर धनंजय महाडिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना भाजपचे प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आले. आता ते जर निवडणुकीच्या रिंगणात आले तर ही निवडणूक बिनविरोध होणार नाही.
राज्यसभेसाठी कोल्हापूरचे दोन मल्ल झुंजणार?
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजप आमने-सामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. भाजपने जर धनंजय महाडिक यांच्या नावाची घोषणा केली तर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. शिवसेनेने या आधीच कोल्हापूरच्या संजय पवारांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे दोन मल्ल झुंजण्याची शक्यता आहे.
Check Also
शिवसेना ठाकरे गटाची १५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
Spread the love मुंबई : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. …