मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या तीन उमेदवारांनी आज (दि.30) अर्ज दाखल केले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत आज त्यांनी आपले अर्ज दाखल केले.
अर्ज दाखल केल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, भाजपचे तिन्हीही उमेदवार निवडून येतील. त्यामुळे घोडेबाजार रोखण्यासाठी शिवसेनेने उमेदवारी मागे घ्यावी.
धनंजय महाडिक यांनी अर्ज भरण्यासाठी जाण्यापूर्वी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी मी कायम सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. सिद्धिविनायकाच्या कृपाशीर्वादाने व सर्वांच्या साथीने ती संधी पुन्हा लाभेल, असा विश्वास त्यांनी ट्विट करत व्यक्त केला आहे.
