नवी दिल्ली : लोकसभेच्या विशेषाधिकार संसदीय समितीने नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्य सचिव, राज्याचे महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना समन्स बजावलं आहे. खासदार नवनीत राणा यांनी समितीकडे कारागृहात आपल्यासोबत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता.
भाजपाचे खासदार सुनील सिंग यांनी नवनीत राणा यांच्या आरोपांची दखल घेत हे समन्स बजावलं आहे. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. यावेळी आपण मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी आपला छळ केल्याचा, तसंच बेकायदेशीररित्या आपल्याला अटक करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी पत्राद्वारे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली होती. त्यानंतर या दोघांनी त्यांची भेटही घेतली होती. त्यानंतर बिर्ला यांनी या समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले होते.
23 मे रोजी राणा दाम्पत्याने आपली बाजू मांडण्यासाठी या विशेषाधिकार समितीची भेट घेतली होती. त्यानंतर या समितीने महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे, पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना समन्स बजावण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याच्या इशार्यानंतर राणा दाम्पत्याला 23 एप्रिल रोजी त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानातून अटक करण्यात आली होती. यावेळी आपण मागासवर्गीय असल्याने खार पोलिसांनी आपल्यासोबत गैरव्यवहार केल्याचा आरोप नवनीत राणांनी केला होता.
