पुणे (वार्ता) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यविश्वातील प्रसिद्ध लेखक आणि मुक्तागंण व्यसनमुक्तीचे केंद्राचे संचालक डॉ. अनिल अवचट यांचे आज सकाळी पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. दीर्घ आजाराने त्यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशी मान्यवरांची प्रतिक्रिया येत आहे.
सकाळी सव्वा नऊ वाजता पत्रकार नगर येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय आणि मोठा मित्रपरिवार आहे. डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढेही असाच पुढे चालू राहील, असा दिलासा मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ही दुःखद बातमी सांगताना दिला.
महाराष्ट्राातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्याततील ओतूर येथे झाला. त्यांनी पुण्याातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी घेतली. मात्र, यानंतर त्यांच मन वैद्यकिय क्षेत्रात रमलं नाही. ते सामाजिक चळवळीमध्ये सहभागी झाले. सामाजिक कार्यासाठी तळमळीने लढणार्यांनी अवचटांनी आपल्या लेखणीतून सामाजिक प्रश्नांवर प्रकाशझोत टाकला.
डॉ. अनिल अवचट यांनी विविध घटकांचे प्रश्न पाहिले, ते समजून घेतले आणि तितक्याच प्रभावी भाषेत संपूर्ण समाजासमोर मांडले. त्यांनी तळागाळातील माणसांच्या वेदना आणि जगणं मांडलं. मुक्त पत्रकार असणार्या अवचटांनी विविध प्रश्नांशी थेट भिडताना मजूर, वेश्या, भटक्या जमाती आणि वंचित घटकांचे प्रश्नं मांडले. अनिल अवचट यांच्या पत्नी डॉ. अनिता अवचट यांनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र सुरु केले.
डॉ. अनिता अवचट यांच्या निधनानंतर या केंद्राच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्तीसंदर्भात आदर्शवत असे काम केले. अनिल अवचट यांनी अनेक क्षेत्रात मुशाफिरी केली. नेमकं जगावं कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी नव्या पिढीला आपल्या कृतीतून दिले. सामाजिक प्रश्नांना थेट भिडणारे अनिल अवचट यांची प्रवास वर्णनही तितकेच स्मरणीय ठरले.
डॉ. अनिल अवचट यांची पुस्तके
माणसं, हमीद, वाघ्या मुरळी, संभ्रम, कोंडमारा, गर्द, धागे आडवे उभे, धार्मिक, स्वत:विषयी, अमेरिका, अक्षरांशी गप्पा, आपले ‘से’, आप्त, मोर, कार्यमग्न, छेद, वेध, कार्यरत, कुतूहलापोटी, गर्द, छंदाविषयी, जगणत्याले काही, जिवाभावाचे, धागे आडवे उभे, पुण्याची अपूर्वाई, पूर्णिया, प्रश्न आणि प्रश्न, बहर शिरीराचा : अमेरिकेतील फॉल सीझन, दिसले ते, मजेदार ओरिगामी, मस्त मस्त उतार, मुक्तांगणची गोष्ट, रिपोर्टिंगचे दिवस, लाकूड कोरताना, वनातजगात, सृष्टीत..गोष्टीत आदी.
दुपारी 2.30 वाजता त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे.
![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2022/01/anil.jpg)