मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांचा विजय झाला असला तरी शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेकडून काल रात्रीपासूनच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. असं असतानाच आता एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत. मात्र एकनाथ शिंदे नेमके कुठे आहेत यासंदर्भातील ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत यासंदर्भात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
“विधान परिषदेच्या निकालानंतर काही आमदारांचा संपर्क होत नाहीये हे सत्य आहे. काही आमदार मुंबईत नाहीत. पण आज सकाळपासून काही आमदारांचा संपर्क झालेला आहे. काही आमदारांना गैरसमजातून त्यांना बाहेर नेण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे बाहेर असून त्यांच्यासोबत संपर्क झालेला आहे. जे चित्र निर्माण केले जात आहे त्यामध्ये शिवसेनेला कोणतेही तथ्य वाटत नाही. काही ठिकाणी संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यासोबत यासंदर्भात बैठक आहे,” असे संजय राऊत म्हणाले.
