खानापूर : मराठी भाषिकांना परिपत्रके मराठीमधून मिळावीत सरकारी कारभाराची माहिती मराठीमधून उपलब्ध व्हावी यासाठी 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा निघणार आहे. या मोर्चाची जनजागृती खानापूर तालुक्यामध्ये करत असताना शिरोली या गावी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी पत्रके वाटून शिरोली गावातील नागरिकांना मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी या बैठकीचे अध्यक्ष गावचे ज्येष्ठ नागरिक मोताप्पा देसाई होते मोर्चा संबंधी माहिती सांगून बैठकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी शिरोली गावातील नागरिकांनी परिपत्रकामध्ये मराठी भाषेला सरकारी कार्यालयांमध्ये व आधार कार्ड रेशन कार्डवर इतर भाषेबरोबर मराठी भाषेला स्थान मिळावे हा आमचा मूलभूत अधिकार आहे हा अधिकार जर कोणी हिरावून घेत असेल तर संघटित होऊन आम्ही त्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने येऊ, असे सांगितले
यावेळी पी. एच. पाटील यांनी आजपर्यंत सरकारी दरबारी मराठी भाषिकांचे दैनंदिन व्यवहार सुलभ व्हावीत सातबारा उतारे इतर कागदपत्रे मराठीमध्ये मिळावीत त्यासाठी जसे आजपर्यंत समितीच्या आंदोलनामध्ये झोकून कार्य केले तशीच अपेक्षा शिरोली गावच्या नागरिकांकडे केली. यावेळी अध्यक्षांनी आम्ही आमच्या गावातून बहुसंख्येने उपस्थित राहू आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला संघटित होऊन प्रत्युत्तर देऊ असे आश्वासन देऊन मोर्चाला पाठिंबा व्यक्त केला.
मोर्चा संबंधी व इतर कार्याची माहिती देणारी श्री. निरंजन देसाई व महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांची भाषणे झाली. समितीचे ज्येष्ठ नेते सूर्याजी पाटील, युवा समितीचे कार्याध्यक्ष किरण पाटील, राजू पाटील, राजाराम देसाई, प्रवीण देसाई, दिनकर देसाई, नागेश देसाई, भरत देसाई, विलास देसाई, लखन देसाई, श्रीकांत देसाई, बाळू देसाई, विक्रम देसाई, विष्णु राऊत, महादेव राऊत, रामा सुतार, नारायण शिवलकर, प्रकाश देसाई, शंकर देसाई, उत्तम देसाई शाहू राऊत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.