शिवसेनेची जडणघडण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य शिवसैनिक केंद्रस्थानी ठेवून केलेली आहे. शिवसेनेच्या मातोश्रीवर, सेना भवनात सामान्य शिवसैनिकाचा वावर सहज असतो. नेत्यांपेक्षा कार्यकर्ता मोठा हे कायमचं तत्व शिवसेनेत आहे. त्यामुळेच तळागाळातला शिवसैनिक थेट शिवसेनेशी कायमचाच बांधला गेलेला असतो. त्याला कोणत्याही नेत्याची आवश्यकता लागत नाही. आजवर याची प्रचिती अनेक वेळा आली आहे.
शिवसेना अनेक वेळा फुटली, शिवसेनेचे नेते अनेक वेळा शिवसेना सोडून गेले. नारायण राणे असूदे, छगन भुजबळ असूदे किंवा राज ठाकरे असूदे प्रत्येक वेळी ते जाताना सामान्य शिवसैनिक त्यांच्याबरोबर गेलाच नाही, ही शिवसेनेच्या जडणघडणीची ताकत आहे.
कालच्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाने ती पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. आमदार गेले, मंत्री गेले.. सामान्य शिवसैनिक मात्र शिवसेना भवनाशी निगडित राहिला. एकनाथ शिंदे यांच्या कृतीने सामान्य शिवसैनिक घायाळ झाला, उद्विग्न झाला, हताश झाला पण उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडायचा निर्णय घेतला तसा ढसा ढसा रडला. आणि शिवसैनिक जिद्दीने रस्त्यावर उतरला. परत आपली घोषणा दिली ‘कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला’ ही चेतना, ऊर्जा शिवसेनेत परत निर्माण होत गेली. ‘शिवसेना अंगार है…बाकी सब भंगार है’ ही त्यांची आवडती घोषणा परत घुमू लागली. आणि शिवसेना परत चैतन्याने धावू लागली. रस्त्यावरच्या लढाईतून निर्माण झालेली शिवसेना… मराठी अस्मितेसाठी लढणारी शिवसेना ही मराठी अस्मितेचे प्रतीक आहे.
मुंबईसाठी शिवसेनेने गुजरात बरोबर दिलेला लढा, त्यांच्या आठवणीत ताजा झाला आणि एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची अब्रू गुजरातच्या वेशीला टांगली याचा अंगार शिवसैनिकांच्या आतून तयार झाला. हे महाराष्ट्रभर लोन पसरले आणि शिवसैनिक एकसंघपणे परत एकदा सेना भवनांशी निगडित राहिला. बेळगावच्या शिवसैनिकांची अवस्था देखील त्याहून काही वेगळी नाहीच.
एकनाथ शिंदे यांचे बंड हे अकाली नाही. नियोजित कटाचा तो भाग आहे. धर्मयोद्धा या चित्रपटाची निर्मिती, तिकिटांचे सीमावर्तीभागासह महाराष्ट्राभर फुकट वितरण, अनेक संघटनांना भरघोस केलेल्या मदती, वैद्यकीय सेवेसह वाटलेल्या शेकडो रुग्णवाहिका हे प्रतिभा निर्मितीचं काम होतं. एकनाथ शिंदे यांचा प्रवास सामान्य रिक्षाचालक ते कॅबिनेट दर्जाचा मंत्री हा सुसाट आहे. त्यामुळे भाजप त्यांना सहज ईडीची भीती घालू शकले. शिंदे यांचं बंड हे अस्मितेचं नसून, कातडी बचावण्यासाठी आहे असा जनतेत समज आहे. हे शिंदे यांच्यासाठी घातक आहे. मराठीच्या अस्मितेसाठी शिवसेनेचा लढा हे तत्त्व बेळगावात अधिक प्रकर्षानं पुढे येते त्यामुळे भाजपच्या गळाला लागून एकनाथ शिंदे यांनी केलेला एल्गार बेळगावच्या शिवसैनिकांना देखील पसंत पडलेला नाही.
‘सत्तेसाठी नाही, तर हक्काच्या संघर्षासाठी शिवसेना’ असे म्हणणारे शिवसैनिक कोणत्याही आमिषाला बळी पडत नाहीत. एकनाथ शिंदे यांच्यासारखा माणूस ईडीच्या चौकशीला घाबरून शिवसेनेच्या गळ्यालाच नख लावायला उठले हे सामान्य शिवसैनिकांना पचनी पडलेलं नाही. सामान्य रिक्षावाल्यापासून ते थेट कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांपर्यंतची सगळी पदं शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना दिली. तेच एकनाथ शिंदे शिवसेना संपवायला उठले याचं वैषम्य शिवसैनिकांना वाटते आहे. सामान्य शिवसैनिक हळवा आहे, कडवा आहे… नाही हीच भावना बेळगावातील शिवसैनिकांची आहे.
वृत्तवाहिन्यांवर ज्याप्रमाणे गुजरात पोलिसांनी महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींना कसं बेअब्रू केलं हे बघितल्यानंतर बिकाऊ, डरपोक एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची अब्रू गुजरातच्या वेशीला टांगली अशी तीव्र भावना निर्माण झाली. मुंबईसाठी गुजराती नेहमीच आग्रही राहिले आहेत, त्यांना मुंबई हवी आहे. म्हणून महाराष्ट्राची अस्मिताच संपवणं त्यांना गरजेचे वाटतं. शिवसेना संपली तर त्यांचे काम सोपे होईल. सीमाभागाचे समन्वयक मंत्री एकनाथ शिंदेनी एकदाही या मंत्री काळात सीमाभागाला भेट दिली नाही. त्या पाठीमागे भाजपचा दबाव हेच कारण असू शकते. महाराष्ट्राचे अहित पाहणाऱ्यांच्या बरोबर जाऊन एकनाथ शिंदेनी महाराष्ट्राच्या मुळावरच घाव घातला आहेत हे मात्र खरं.
