माणगांव (नरेश पाटील) : माणगांव शहरातील कचेरी रोड येथे मध्यरात्री एका युवकावर बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा थरारक प्रकार घडला. त्यामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. सदर घटना माणगांव पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.
सदर घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सदर घटना रात्री 12.10 वाजता घडली. कचेरी रोड येथील शारदा स्वीट मार्ट जवळ घडली. जखमी युवकाचे नाव शुभम ग्यानचंद्र जैसवाल (वय 24) असे आहे. सदर तरुण रात्री आपले मेडिकल दुकान बंद करून घरी चालत जात असताना शारदा स्वीट मार्टसमोर आला असता कचेरी रोड येथून एका काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकलवरून दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ येऊन इंदापूर रस्ता कुठे आहे असे विचारण्याचे निमित्त करून बोलण्यात गुंतवून ठेवले तर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने पिस्तुल काढून पोटावर गोळ्या झाडल्या आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गांने इंदापूर मार्गे पळून गेले.
सदर युवक हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. माणगांव पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद झाली आहे. माणगांव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. आर. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमलदार पोराई बेग हे अधिक तपास करीत आहेत. या घटनेची माहिती शहरात पसरताच संपूर्ण शहर सुन्न झाले होते. एरवी शांत शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या माणगांव शहरात अशी थरारक घटना कशी काय घडली अशी चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे.
