Friday , November 22 2024
Breaking News

भाजपकडून लोकशाहीच्या संस्था उद्धस्त करण्याचं काम सुरू, महाराष्ट्रानंतर आता गोव्यात प्रयोग; शरद पवारांचा आरोप

Spread the love

औरंगाबाद: भाजपकडून लोकशाहीच्या संस्था उद्धस्त करण्याचं काम सुरू असून कर्नाटक, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रानंतर आता गोव्यातही असा प्रयोग राबवला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. सत्ता गेली म्हणून अस्वस्थ झालेले आता कमी अस्वस्थ झाले असतील असा टोला त्यानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. मध्यावधी निवडणुका होतील असं कधीच म्हटलं नाही, मी म्हणालो की अडीच वर्षे झाली, आता अडीच वर्षे राहिली, आपण आतापासून निवडणुकीला तयार राहिलं पाहिजे असं शरद पवार म्हणाले.
महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “सरकार पाडण्यासाठी काही निश्चित कारण नव्हतं. कुणी राष्ट्रवादीचे नाव घेतं, कुणी हिंदुत्वाचं कारण सांगतं, तर कुणी ईडीचे नाव घेतलं. ही सर्व कारणं सुरतला गेल्यानंतर ठरली. त्या आधी तसं काही कानावर आलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी ते जनतेसमोर यावं आणि स्पष्ट करावं. त्यांच्याकडे काहीच सक्षम कारण नाही.”

उद्धव ठाकरे बंड का मोडू शकले नाहीत

शरद पवार म्हणाले की, “आमच्यात काही घडलं असतं तर तुमच्या प्रश्नाला उत्तरं दिलं असतं. राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांशी संवाद साधण्याचा माझा अधिकार आहे, त्यांनाही तो अधिकार आहे. त्यावेळी राष्ट्रवादीच्या माझ्या सहकाऱ्यांचा समावेश होता. आपली ती भूमिका नाही, भाजपसोबत जायचं नाही असं मी सांगितलं आणि ते परत आले. बाळासाहेब असताना असं काही घडल्यास वेगळी परिस्थिती असायची. उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना कार्यकर्त्यांना हिंसक होऊ नका अशी आदेशवजा सूचना केली, त्यामुळे आज शिवसैनिक शांत असतील.”

हे चमत्कारिक राज्यपाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, “आम्ही अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी अशी राज्यपालांकडे मागणी केली होती, ती काही त्यांनी मान्य केली नाही. त्यांच्याकडे बहुतेक खूप काम असेल. पण दुसरं सरकार आलं आणि त्यांनी ही मागणी 48 तासामध्ये मान्य केली. हे असं करणारे आपले पहिलेच राज्यपाल असतील.”
आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये राज्यपाल पदाची प्रतिष्ठा जपणारे राज्यपाल मिळाले होते. हे आताचे जरा चमत्कारिक राज्यपाल आहेत, पण राज्यपाल असल्याने मी त्यांच्यावर जास्त काही बोलणार नाही असा टोला शरद पवारांनी लगावला.

नामांतरावर चर्चा झाली नाही

शरद पवार म्हणाले की, “औरंगाबादचे नामांतर हे संभाजीनगर करण्यात आलं, हा मविआचा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता. हा निर्णय शेवटच्या क्षणी घेतला. प्रस्ताव मंजूर केल्यानंतर आम्हाला समजलं. पण मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर त्यावर काही बोलणं योग्य नसतं. पण मूलभूत समस्यांकडे अधिक लक्ष दिलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं.”

देशाच्या सर्व विरोधी पक्षांनी मला राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार व्हावं अशी विनंती केली होती. पण यश येण्याची स्थिती काटावर होती. पण माझ्यासारख्या व्यक्तीला लोकांपासून दूर जाणं हे जमलं नसतं, म्हणून मी ते स्वीकारलं नाही असं शरद पवार म्हणाले. राऊतांवर टीका करणारे दीपक केसरकर हे एकेकाळी मनाने आणि शरीराने राष्ट्रवादीमध्ये होते असा टोला यावेळी शरद पवारांनी लगावला.

About Belgaum Varta

Check Also

भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर

Spread the love  मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *