मुंबई : शिवसेनेचे बंडखोरे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे गट आता स्वत:ची कार्यकारिणी तयार करणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे शिंदे गटातील आमदारांच्या बैठकीत शिवसेनेच्या 14 खासदारांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेवर दावा करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर शिंदे गटातील आमदारांची बैठक आज ट्रायडेंट हॉटेलमध्ये पार पडत आहे. या आमदारांच्या बैठकीत शिवसेनेच्या 19 पैकी 14 खासदारांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे 14 खासदार शिंदे गटात सामिल होणार असल्याची चर्चा सुरू होती. शिवसेना खासदारांमध्ये झालेली फूट म्हणजे उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत जाणार आहेत.
खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे गट अधिक आक्रमक झाल्याचे चित्र आहे. त्यासाठी आता खासदारांपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गट जोरदार प्रयत्न करत आहे.