माणगांव (नरेश पाटील) : माणगांवचा विकास हाच ध्यास ठेवून मतदारांना सामोरे गेलेल्या माणगांव विकास आघाडीला जनते भरभरून प्रेम देऊन नगरपंचायतमध्ये सत्तेवर बसविले. याची परतफेड म्हणून तसेच सत्तेवर येताच माणगांव विकास आघाडीने माणगांव शहराची विविध विकासकामे होण्याकरिता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मुंबई शासकीय निवासस्थानी भेट दिली. ना. सुभाष देसाई यांनी तात्काळ शनिवारी दि. 15 फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील दालनात माणगांव शहराच्या विकासकामांची चर्चा व मार्गी लावण्याकरिता एक बैठक आयोजित केली. यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, सदस्य कपिल गायकवाड, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, राजीव साबळे, डॉ. संतोष कामेरकर, जीवन प्राधिकरणाचे संचालक अभिषेक कृष्णा, मुख्याधिकारी राहुल इंगळे आदी उपस्थित होते.
प्रतिष्ठेच्या माणगाव नगरपालिकेवर यंदा शिवसेनेचा भगवा फडकला. या विजयानंतर उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी माणगांव शहरातील विकासकामांबाबत मंत्रालयात बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज माणगांव नागरपालिकेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना सुरू करणे, मुंबई-गोवा महामार्गावरील खांदाड, मोबीरोड, नाणेरे येथे पाणी पुरवठा योजना सुरू करणे, काळनदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणे, नगरपालिकेच्या नवीन इमारतीसाठी निधी व नियोजन करणे, प्रलंबित नाट्यगृहाला चालना देणे आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
वरील विषयासंदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करून विकास कामे मार्गी लावण्याच्या सूचना श्री. देसाई यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.