Friday , February 23 2024
Breaking News

पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

Spread the love

माझी वसुंधरा अभियानांतर्गत जनजागृती व जनसहभागावर भर द्या
कोल्हापूर (जिमाका) : माझी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये पुणे विभागाचे काम खूप चांगल्या प्रकारे सुरु आहे, याच पद्धतीने सर्वांनी चांगले काम केल्यास पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल, असा विश्वास पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

“माझी वसुंधरा अभियान” बाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे महसूल विभागाची बैठक कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार ऋतुराज पाटील, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर -म्हैसकर, विभागीय आयुक्त सौरभ राव तसेच कोल्हापूर, सांगली, सोलापूरचे जिल्हाधिकारी अनुक्रमे राहुल रेखावार, अभिजित चौधरी, मिलिंद शंभरकर, कोल्हापूर, सांगली महानगरपालिका आयुक्त अनुक्रमे डॉ. कादंबरी बलकवडे, नितीन कापडणीस, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुक्रमे संजयसिंह चव्हाण, जितेंद्र डूडी, विनय गौडा, सह आयुक्त पूनम मेहता, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, “माझी वसुंधरा अभियान” राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. पर्यावरण रक्षणासाठी या अभियानांतर्गत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करावे. या अभियानाची मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून यात जनसहभाग व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घ्यावा. या अभियानात शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, तरुण, वयस्कर अशा सर्व वयोगटातील व्यक्तींना सहभागी करुन घ्यावे, जेणेकरुन हे अभियान लोकचळवळ होईल.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, हे अभियान लोकप्रिय मोहीम होत आहे. विभागातील सर्व जिल्ह्यांनी खूप चांगले उपक्रम राबवले असल्याबाबत कौतुक करून या कामाची एकत्रित पुस्तिका तयार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पर्यावरण रक्षणाच्या कामात प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपल्या घरासोबत आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास पर्यावरण संवर्धनाचे उद्दिष्ट साध्य होईल. प्रशासनाच्या वतीने विकास कामांचे नियोजन करताना या कामामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबतही अभ्यास करावा, जेणेकरुन पर्यावरणाचे रक्षण होईल. पर्यावरण रक्षण व प्रदूषण नियंत्रण यासाठी विभागीय स्तरावर समिती नियुक्त करावी. तसेच याविषयीच्या आवश्यक त्या सूचना राज्य शासनाला सादर कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर म्हणाल्या, पर्यावरण रक्षणासाठी “माझी वसुंधरा” अभियान अत्यंत महत्त्वपूर्ण असून हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. या अभियानांतर्गत यंत्रणेने उत्कृष्ट काम करुन त्या-त्या जिल्ह्यांनी केलेल्या कामाची माहिती शासनाला लवकरात लवकर संकेतस्थळावर भरावी.

प्रारंभी ‘माझी वसुंधरा’ चे उपसंचालक सुधीर बोबडे यांनी सादरीकरणातून अभियान, वैशिष्ट्ये, बक्षिस व उपक्रमांची माहिती दिली.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे विभागात झालेल्या कामाची माहिती दिली. या अभियानांतर्गत ‘नमामी चंद्रभागा’ अभियान राबवून नदी स्वच्छतेची मोहीम घेण्यात आली. यावर्षी सौर ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापरावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 2.0 मध्ये पुणे विभागाचे काम उत्कृष्ट होण्यासाठी केलेल्या नियोजनाची माहिती दिली.
यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या अभियानांतर्गत शहर व जिल्ह्यात केलेल्या व करण्यात येणाऱ्या कामाची माहिती दिली. यावेळी सौर ऊर्जा, सौरपंपाचा वापर, बायोगॅस प्लॅन्ट, फुलपाखरु उद्यान, बागबगीचा सुशोभीकरण, जलपर्णीवर उपाययोजना, नदी स्वच्छता व सार्वजनिक ठिकाणची साफसफाई, जल व हवा प्रदूषण नियंत्रण आदी विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

शरद पवार गटाला चिन्ह मिळालं; ‘तुतारीवाला माणूस’

Spread the love  मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला ‘तुतारीवाला माणूस’ हे चिन्ह मिळालं …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *