मुंबई : पूर्व परवानगी मागूनही पालिकेने अद्याप निर्णय घेतला नसल्याचे सांगत शिवसेनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेने गणेशोत्सवापूर्वीच महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, महापालिकेच्या जी-उत्तर प्रभागाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. आता, उच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे.
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. गणेशोत्सवापूर्वीच शिवसेने महापालिकेकडे मैदानासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर काही दिवसांनी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी मैदानासाठी अर्ज दाखल केला. दोन्ही गटांच्या अर्जावर महापालिकेने कोणताही निर्णय घेतला नाही. शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेत मुंबई महापालिका आणि राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळू नये यासाठी राज्य सरकारचा महापालिकेवर दबाव असल्याचा आरोप शिवसेनेचे विभागप्रमुख मिलिंद वैद्य यांनी केला. एक महिन्यांचा कालावधी झाला तरी परवानगीबाबत कोणताही निर्णय झाला नाही. दुसर्या गटाने बीकेसीसाठी परवानगी मागितली होती, त्यांना मिळाली, त्या ठिकाणी त्यांनी पैसेही भरले आहेत. एकाच ठिकाणी दोन गटाने अर्ज केला असता तर त्याचा विचार केला गेला असता. पण आता तोही प्रश्न उरला नाही. या मेळाव्याला परवानगी देताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचं सांगितलं जातंय. पण त्याचा इथे काही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेकडून कोणत्याही परिस्थितीत शिवतीर्थावर मेळावा घेतला जाणार असल्याचे वैद्य यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta