पुणे : शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला कसा गेला बद्दल पुण्यातील तळेगावात जनआक्रोश मोर्चाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रानं गुणवत्तेच्या जोरावर आतापर्यंत विविध कार्यालय आणि उद्योग राज्यात खेचून आणले होते. महाराष्ट्रात जो प्रकल्प १०० टक्के येणार हे ठरलं होतं मग सरकार बदलल्यावर कसा पळवला, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. आमचे ४० आमदार पळवून गुजरातला पुढं गुवाहाटी आणि गोव्यातून महाराष्ट्रात आणले. तसाच हा प्रकल्प व्हाया गुवाहाटी महाराष्ट्रात आणणार आहात का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.
तेव्हा आमच्या बाजूला जे ४० गद्दार बसले होते ते स्वत: ला वाचवायला महाराष्ट्राला मागं टाकायला निघाला होता. महाराष्ट्रात आणि गुजरात माध्यमांनी दाखवलेला फरक आपल्या समोर आहे. वेदांताला गुजरातपेक्षा १० हजार कोटींची सबसिडी अधिक महाराष्ट्र सरकार देणारं होतं. गुजरातबद्दल मला चुकीचं बोलायचं नाही. गुजरातच्या उद्योगमत्र्यांनी महाराष्ट्रात खोके सरकार बनल्यानंतर त्यांनी मौका पे चौका मारला आणि प्रकल्प गुजरातला घेऊन गेले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना वेदांता फॉक्सकॉन कधी आला, कसा आला आणि गेला हे समजलं नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. रोजगाराचा प्रश्न शिवसेनेनं मांडला. वेदांताचा प्रश्न प्रथम शिवसेनेनं मांडला, पुढं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस देखील उभी राहिली. महाराष्ट्रातील जनता देखील वेदांताच्या मुद्यावर उभी राहिली.शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला याचं दु: ख आहे. महाराष्ट्रातील तरुणांच्या पाठीत खंजीर खोके सरकारनं खुपसला असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. दिल्लीत स्वत: साठी आठ ते नऊ वेळा गेलात. पण, महाराष्ट्राला काय आणि कधी मिळणार हे विचारण्यासाठी दिल्लीला कधी जाणार, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.
Belgaum Varta Belgaum Varta