मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासाठी आम्ही सर्व पुराव्यांसह सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास असून सर्वोच्च न्यायालय यावर योग्य निर्णय घेईल. सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणीच मोठं नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत. आमचा भाग आम्हाला मिळणारच आहे, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याबरोबरोबरच पक्षाचा वाद कोणीही सीमा प्रश्नात आणू नये, असे आवाहन देखील यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते मुंबईत माध्यमांसोबत बोलत होते.
महाराष्ट्रातील एकही गाव बाहेर जाणार नाही आणि आमचा सीमा भाग आम्हाला परत मिळेल. बेळगाव, निपाणी आणि कारवार हा आमचा भाग आहे. ही आमची भूमिका आहे. आमची ही भूमिका आम्ही न्यायालयात माडंली आहे. कायद्याच्या चौकटीत आम्ही मागणी केली आहे. परंतु,यात कोणीही राजकारण आणू नये. या पूर्वी सर्वात जास्त काळ कर्नाटक आणि महाराष्ट्रात देखील काँग्रेस आणि मित्र पक्षांचं सरकार होतं. परंतु, त्यांच्याकडून हा प्रश्न सुटला नाही. आम्ही हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सीमा प्रश्नावरून कोणीही राजकारण करू नये. प्रत्येकाने याबाबत बोलताना विचार करून बोललं पाहिजे. आजपर्यंत पक्षाचा वाद सीमा वादात आणला नाही. सीमा भागासाठीचा आपला लढा सुरूच राहील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे
Belgaum Varta Belgaum Varta