मुंबई : महाराष्ट्रातील खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. आज सकाळी महाराष्ट्राचे भाजप खासदार मोदींसोबत अनेक विषयांवर चर्चा करणार आहेत. सीमावाद, राज्यपालांची वक्तव्यं यावर भाजप खासदार गाऱ्हाणं मांडणार असल्याची माहिती आहे. यासोबतच पंतप्रधान मोदी इतर दोन राज्यांच्या खासदारांशीही चर्चा करणार आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडीचे खासदार गृहमंत्र्यांनाही भेटणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून शुक्रवारी सकाळी सव्वा अकराची वेळ देण्यात आली आहे त्यामुळे सदर बैठक आज होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे खासदार सुरेश धनोरकर, अरविंद सावंत, सुप्रिया सुळे, विनायक राऊत, श्रीनिवास पाटील, राजन विचारे, डॉ अमोल कोल्हे, ओमराजे निंबाळकर व सुनील तटकरे यांचा समावेश अमित शहा यांच्या भेटीला जाणाऱ्या शिष्टमंडळात असू शकतो.
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जमावबंदी, 15 दिवसांसाठी आदेश लागू
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जमावबंदी आदेश लागू झाला आहे. कोल्हापुरात 15 दिवसांसाठी जमावबंदी असेल. या काळात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे. तसंच मिरवणुका आणि सभांनाही बंदी असेल. अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी काल (8 डिसेंबर) जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
कोल्हापुरात जमावबंदी का?
सीमाप्रश्नावरुन महाविकास आघाडीच्या कर्नाटक सरकारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 9 डिसेंबरपासून 23 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू असतील. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोट कलम (1)अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta