माणगांव (नरेश पाटील) : 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माणगांव नागरपंचायतीने खास महिलांकरिता एकदिवसीय आरोग्य शिबीर बुधवार दि. 9 मार्च रोजी सकाळी 10.00 वाजल्यापासून उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराची पूर्व तयारी म्हणून एक आढावा बैठक सोमवार दि. 7 मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालयात पार पडली.
त्यावेळी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, डॉ. संतोष कामेरकर, अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले, नेत्र चिकित्सक डॉ. डोईफोडे व रुग्णालयातील नर्स तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले व डॉ. कामेरकर यांनी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांना शिबिराच्या तयारीची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने मुंबई येथील टाटा हॉस्पिटल तसेच स्थानिक खाजगी डॉक्टर्स तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मान्यवर तसेच कार्यक्रमाची रूपरेषा, आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या महिला रुग्णांची नोंद करणे, उपस्थितांच्या भोजनाची व्यवस्था, औषध किट पुरविणे, स्वयंसेवक म्हणून एनएसएसचे विद्यार्थ्यांची मदत घेणे व इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
दरम्यान या शिबीरासाठी मुंबई येथून टाटा हॉस्पिटलचे सुमारे 30 हुन अधिक वैद्यकीय तज्ञांचे एक पथक येणार असल्याचे डॉ. संतोष कामेरकर यांनी आमच्या जिल्हा प्रतिनिधी यांना माहिती देताना सांगितले.
या दरम्यान सोमवारी संपूर्ण माणगांव नगरीत रिक्षाद्वारे दवंडी फिरून बुधवारी होणाऱ्या आरोग्य शिबिराची माहिती देण्यात येत होती. तसेच मंगळवारी व बुधवारी होणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमाच्या जय्यत तयारीचा पाठपुरावा नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार करीत आहेत.