माणगांव (नरेश पाटील) : माणगांव उपजिल्हा रुग्णालयात आणि नगर पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून दि. 9 मार्च रोजी खास महिलांसाठी आयोजित आरोग्य शिबिराचे उदघाटन उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.प्रदीप इंगवले, तहसीलदार प्रियांका आयरे, पं. स. अध्यक्ष अलका जाधव, माणगांवचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, कार्यकारी अधिकारी राहुल इंगळे, सर्व सभापती, सदस्य, दक्षिण रायगड जिल्हा शिवसेना अध्यक्ष अनिल नवगणे, तालुका अध्यक्ष गजानन अधिकारी, शेकापचे नाना सावंत, ज्येष्ठ नेते राजीव साबळे, डॉ. कामेरकर, प्रमोद घोसाळकर तसेच सुजित शिंदे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
मंत्री ना.सुभाष देसाई आपल्या भाषणात महिला वर्गाला उद्देशून म्हणाले की, महिला वर्गाने आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी तसेच छोट्या मोठ्या तक्रारींचे तात्काळ निदान करा. त्याचबरोबर महिला दिनी महिलांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन केल्याबद्दल उपजिल्हा रुग्णालय आणि नगरपंचायतीचे विशेष कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. कामेरकरांनी पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच महिला ही कुटुंबाचा आधार आहेत महिला सक्षम तर कुटुंब सक्षम त्यामुळे महिलांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्लाही दिला. पुढे बोलताना देसाई म्हणाले की, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी आपल्याला माणगांव शहरातील समस्या आपल्या निदर्शनास आणून दिल्या आहेत आणि आपण त्याकडे जातीने लक्ष घालून सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणार असे आश्वासनही यावेळी मंत्रीमहोदयानी दिले आणि उपजिल्हा रुग्णालयात दर्जेदार सुविधा मिळवून देणार, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरूवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. तर नगरसेवक पवार यांनी उपस्थितांचे शाल, श्रीफळ आणि फुलांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली.
कार्यक्रमाची प्रस्तावना शिवसेना नेते राजीव साबळे यांनी केले. गौरी भावे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर उपनगराध्यक्ष सचिन बोंबले यांनी आभार मानले. 150 हुन अधिक महिलांनी शिबिराचा लाभ घेतला.
