Thursday , June 20 2024
Breaking News

दुचाकीच्या धडकेत एक जण ठार

Spread the love

देवचंद महाविद्यालय जवळील घटना : दुसरा दुचाकीस्वार गंभीर

निपाणी (वार्ता) : दोन दुचाकींच्या धडकेत एक जण जागीच ठार तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.९) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. निपाणी मुरगुड रोडवरील देवचंद महाविद्यालयाजवळ हा अपघात झाला. आकाश उर्फ अक्षय सुरेश मातीवड्डर (वय २६ रा. वड्डर गल्ली, जुने संभाजीनगर निपाणी) आणि कृष्णा पांडुरंग मुगळे (वय ४० रा. धामणे ता. आजरा) असे गंभीर जखमीचे नाव आहे.

याबाबत पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, मयत आकाश हा गवंडी काम करत होता. बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गायकवाडी येथून तो आपल्या राहत्या घराकडे दुचाकीवरून (क्र.एम.एच. ०९ ए.एस.२९५८) निघाला होता.
त्याचवेळी आजरा तालुक्यातील धामणी येथील कृष्णा मुगळे हे आपल्या दुचाकीवरून (क्र.एम.एच. ०९ ए.के.५२८८)
निपाणीकडून गायकवाडीकडे निघाले होते. याचवेळी देवचंद महाविद्यालयाच्या पुढील बाजूस दोन्ही दुचाकींची धडक होऊन हा अपघात झाला. त्यामध्ये दोघांनाही मोठी दुखापत झाली. मात्र निपाणी येथील युवक आकाश उर्फ अक्षय मातीवड्डर त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर कृष्णा मुळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ आरोग्यकवच वाहनातून उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर येथील महात्मा गांधी रुग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनास्थळी उपनिरीक्षक कृष्णवेणी गर्लहोसुर, हवालदार एस. एस. चिक्कोडी व सहकार्यानी भेट देऊन पंचनामा केला. या अपघाताची माहिती मिळताच मातीवड्डर कुटुंबीयांनी आक्रोश केला. रात्री उशिरा महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करून आकाशचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी नगरसेवक विलास गाडीवड्डर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मयत आकाश मातीवड्डर याच्या मागे आई, वडील, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. त्याची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून आकाशच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. निपाणी शहर पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.
—-
वर्षभरात तिघांचा मृत्यू
मुधोळ-फोंडा या आंतरराज्य रस्त्याचे कर्नाटक हद्दीतील काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूकीची वर्दळ वाढली आहे. बुधवारी झालेल्या अपघातस्थळ परिसरातच वर्षभरात तिघांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तरी प्रशासनाने देवचंद महाविद्यालयापासून दोन्ही बाजूला पाचशे मीटरपर्यंत रबरी गतिरोधक बसविण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

जत्राटवेस- लखनापूर पुलाचे काम करा

Spread the love  नागरिकांचे निवेदन; पालकमंत्र्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : जत्राटवेस लखनापूर केसरकर मळा मार्गावरील ओढ्याचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *