मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून ही दुसरी नोटबंदी आहे. यावरून देशभरातील विरोधी पक्षांनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. नोटाबंदीचा निर्णय राजकीय असून दोन हजारांची नोटबंदी ही लोकसभा निवडणुकांची पहिली घंटा आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.
नोटाबंदीचा काडीचाही फायदा नाही
“भारतीय अर्थव्यवस्थेचा जो खेळखंडोबा सुरू आहे, त्यास इतिहासात तोड नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून तडकाफडकी बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या नोटाबंदीचा खटका पंतप्रधान मोदी यांनी स्वतः वृत्तवाहिन्यांवर येऊन दाबला. पाचशे आणि एक हजारच्या नोटा त्यांनी चलनातून बाद केल्या व एकच हाहाकार उडाला. मोदी रात्री आठ वाजता टीव्हीवर प्रकट झाले व दुसऱ्या दिवसापासून त्यांनी संपूर्ण देशाला ‘नोटा’ बदलण्यासाठी बँकांच्या रांगेत उभे केले. त्या रांगेत देशभरात चार हजारांवर माणसे मरण पावली व नोटाबंदीचा काडीचाही फायदा झाला नाही. उलट लहान उद्योग, छोटे व्यापारी देशोधडीस लागले. नोकऱ्या गेल्या. काळा पैसा बाहेर येईल, असे मोदी म्हणाले. उलट काळा पैसा जास्तच वाढला. दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा नोटाबंदीमुळे थांबेल असा त्यांचा दावा होता. प्रत्यक्षात उलटेच झाले”, अशी टीका या अग्रलेखातून करण्यात आली.
नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे राजकीय
“मोदींनी हजाराची नोट चलनातून बाद केली व दोन हजारांची गुलाबी नोट आणली. त्यामुळे हजार-पाचशेत होणारी लाचखोरी दोन हजारांच्या नोटेत पोहोचली, हेच नोटाबंदीचे फायदे. आता मोदींनी ‘लहर’ आली म्हणून दोन हजारांची नोटही बाद केली. हा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केला. आपल्या देशातील न्यायालये, घटनात्मक संस्था, निवडणूक आयोग जेथे स्वतंत्र आणि निष्पक्ष राहिले नाहीत, तेथे भारताची रिझर्व्ह बँक दोन हजारांच्या नोटांबाबत स्वतंत्र निर्णय घेऊ शकेल काय? दोन हजारांच्या नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे राजकीय आहे. पहिल्या नोटाबंदीच्या वेळी ज्या उदात्त भावनेने नोटाबंदी लादली, तोच प्रकार आता आहे. विरोधी पक्षांकडे २०२४ च्या दृष्टीने थोडेबहुत दोन हजारांच्या नोटांचे चलन राखून ठेवले असेल तर ते बाद व्हावे व विरोधी पक्ष त्यादृष्टीने अडचणीत यावा यापेक्षा दुसरा हेतू असू शकत नाही. कर्नाटकच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून दोन हजारांच्या गुलाबी नोटांचा अफाट वापर झाला, पण दोन हजारांची मात्रा चालली नाही. त्या चिडीतूनही ‘दोन हजारांची नोट बाद’ असा निर्णय झालेला असू शकतो”, असा उपरोधिक टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.
दहशतवादाची कंबर अजिबात तुटलेली नाही
“दोन हजारांची नोटाबंदी ही लोकसभा निवडणुकांची पहिली घंटा आहे. देशाच्या चलनात दोन हजारांच्या नोटा किती आहेत व लोकांनी त्यातील किती दडवून ठेवल्या आहेत? हे एक रहस्य आहे. या सर्व नोटा सप्टेंबरपर्यंत बाहेर काढायच्या आहेत. बँकेत एकावेळी फक्त 20 हजारांपर्यंतच या गुलाबी नोटा जमा करता येतील. मोदी यांचे अंध भक्त म्हणजे एक अजबच रसायन म्हणावे लागेल. एक हजाराची नोट बाद करून दोन हजारांची नोट चालू करणे हा एक मास्टर स्ट्रोक होता व आता दोन हजारांची नोट अचानक बंद करणे हासुद्धा अंध भक्तांसाठी मोदींचा मास्टर स्ट्रोकच आहे. असे ढोंग व दुटप्पीपणा फक्त हे अंध भक्तच करू शकतात. दोन हजारांची नोट चालू करून मोदी हे दहशतवादाची कंबर तोडणार होते व आता तीच दोन हजारांची नोट बंद करून मोदी देशाच्या अर्थव्यवस्थेची कंबर तोडत आहेत. कारण मणिपूरपासून जम्मू-कश्मीरपर्यंत दहशतवादाची कंबर अजिबात तुटलेली नाही. हिंसाचार व दहशतवाद सुरूच आहे”, असंही या अग्रलेखात म्हटलं आहे.
म्हणून नोटाबंदी केली
“पंतप्रधानांची आज सामान्य जनतेत प्रतिष्ठा राहिलेली नाही. सर्व राष्ट्रीय कामे बाजूला ठेवून पंतप्रधान कर्नाटकच्या निवडणुका, सभा व रोड शो घेतात व शेवटी त्यांचा पराभव होतो. त्या पराभवाची चर्चा कमी करण्यासाठी एका रात्रीत दोन हजारांची नोटाबंदी जाहीर केली जाते, पण त्यांच्या निर्णयाने यावेळी ना खळबळ माजली, ना सळसळ झाली. ५० खोकेवाल्यांच्या दुःखात मात्र सहभागी व्हावे लागेल. त्यांना खोक्यात गुलाबी धनच मिळाले असेल. त्यांची धावपळ समजून घ्यावी लागेल इतकेच”, अशी टीका करण्यात आली आहे.