मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षांत मोठी चिखलफेक सुरु असल्याचे पाहायला मिळते. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केलेल्या घोटाळ्यांच्या आरोपामुळे राजकीय वातावर चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील यावर आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत राहणं शिवसेनेसाठी नुकसानकारक आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने राज्याच्या विकासासाठी सोबत यावं असे विधान रामदास आठवले यांनी केले आहे.
शिवसेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडून अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला स्विकारुन भाजप सोबत यावं आणि राज्याचा विकास करावा. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास केंद्राकडून निधी आणता येईल असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांत अंतर्गत वाद असल्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जाता आहेत, त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातील दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेनेने भाजप सोबत यावे असेही पुढे रामदास आठवले म्हणाले आहेत.
दरम्यान, शिवसेना नेते आनंद गीते यांनी राष्ट्रवादीबद्दल केलेल्या वक्तव्यावर देखील त्यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. यावेळी रामदास आठवले म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सन्माननीय आहेत, ते कोण्या एका पक्षाचे नेते नसून महाराष्ट्राचे नेते आहेत. शरद पवारांनी काँग्रेस सोडली नव्हती तर त्यांना काँग्रेसमधून बाहेर काढलं होतं.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर जर एवढे गंभीर आरोप करायचे आहेत, तर शिवसेनेने राष्ट्रवादी सोबत राहूच नये, त्यांनी पुन्हा भाजप सोबत आले पाहिजे, शिवसेनेने भाजप आणि आरपीआय सोबत येऊन बाळासाहेब ठाकरे यांचे शिवशक्ती आणि भिमशक्तीचे स्वप्न साकार करायला पाहिजे अशा भावना रामदास आठवले यांनी व्यक्त केल्या आहेत.
