Monday , December 4 2023

बेळगाव जिल्ह्यातील ‘ती’ सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली

Spread the love

जिल्हाधिकार्‍यांचा आदेश : यल्लम्मा देवस्थानबाबत 28 सप्टेंबरला निर्णय

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले जोगुळभावीचे सत्यम्मा देवी देवस्थान, चिंचली मायक्का देवी, बडकुंद्रीचे होळेम्मा देवस्थान आणि मंगसुळीचे मल्लय्य देवस्थान ही सर्व देवस्थानं उद्या बुधवार दि. 22 सप्टेंबरपासून सशर्त खुली करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जाहीर केले आहे. रायबाग तालुक्यातील चिंचणी येथील श्री मायाक्का देवी देवस्थान, कागवाड तालुक्यातील मंगसुळी येथील श्री मल्लय्य देवस्थान, हुक्केरी तालुक्यातील बडकुंद्री येथील श्री होळेम्मा देवी देवस्थान आणि सौंदत्ती तालुक्यातील जोगुळभावी येथील श्री सत्यमा देवी देवस्थान भाविकांसाठी खुले करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. तथापि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती श्री यल्लमा देवस्थान खुले करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. कोरोना प्रादुर्भावाचा संकटामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार्‍या जिल्ह्यातील प्रमुख देवस्थानांमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भाव निवळल्यामुळे सदर मंदिरे भाविकांसाठी खुली केली जावीत, अशी मागणी लोकप्रतिनिधींसह भाविक आणि हिंदु संघटनांनी सरकारकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन जिल्ह्यातील उपरोक्त चार देवस्थानं उद्यापासून भाविकांसाठी खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भावाची तीव्रता अद्याप कमी झालेली नाही. तेथील भक्त मोठ्या संख्येने सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवी देवस्थानाला येत असल्यामुळे तूर्तास हे देवस्थान खुले करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. सौंदत्ती श्री यल्लमा देवी देवस्थान गेल्या वर्षभरापासून भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. जी देवस्थाने खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे त्या देवस्थानांमध्ये पुढील आदेश येईपर्यंत विशेष उत्सव अथवा यात्रा आयोजनावर निर्बंध असणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी फेसमास्कसह सामाजिक अंतराचा नियम पाळून देवदर्शन घ्यायचे आहे.
देवस्थान आवारात थर्मल स्कॅनिंग आणि सॅनिटायझर उपलब्ध करण्यासह अन्य अटी घालण्यात आल्या आहेत. कोरोना मार्गदर्शक सूचीचे उल्लंघन झालेले आढळल्यास देवस्थान खुले ठेवण्यासाठी दिलेली परवानगी रद्द केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

महामेळावा पूर्वतयारीसाठी उद्या व्हॅक्सीन डेपो येथे समिती कार्यकर्त्यांनी जमावे

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 4 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *