बारामती : राज्यात कोल्हापूरसह अन्य काही दोन, तीन ठिकाणी जे घडले हे महाराष्ट्राला लौकीकाला शोभणारे नाही. महाराष्ट्र हे संयमी, शांतताप्रिय राज्य आहे. येथील सर्वसामान्य लोकांची कायदा हातात घेण्याच्या संबंधीची प्रवृत्ती नाही. कोणी तरी काही तरी प्रश्नातून जाणिवपूर्वक वादविवाद वाढवायचा प्रयत्न करत असेल त्यांनाही माझे आवाहन आहे की, याची किंमत सामान्य माणसाला भोगावी लागते. सामान्य माणसाच्या हितासाठी असे प्रकार न घडतील याची काळजी घ्या, असे आवाहन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.
पवार म्हणाले, राज्यात घडलेल्या प्रकारानंतर शासकीय यंत्रणा किंवा पोलिस यंत्रणा जी काही पावले टाकत आहेत, त्या यंत्रणेला सर्वसामान्यांनी मनापासून सहकार्य कऱण्याची गरज आहे. आपण सगळ्यांनी यंत्रणेला सहकार्य केले तर हे प्रकार तातडीने बंद झाल्याचे आपल्याला दिसून येईल. कोल्हापूर शहर असो की अन्य शहरे असो, या सगळ्या शहरांचा सामाजिक परिवर्तनाचा एे तिहासिक अशी पार्श्वभूमी आहे.
तेथे शांतताच निर्माण केली पाहिजे. छत्रपती शाहू महाराज, महाराणी ताराराणी यांचा आदर्श ठेवून सामान्य माणसाच्या हिताची जपणूक केली पाहिजे. चार-दोन लोक कोणी तरी चुकीचे वागत असतील पण बहुसंख्य समाजाने संयमाची भूमिका घेतल्यानंतर राज्य शासनाने त्यामध्ये सामंजस्याची भूमिका घेतल्यानंतर ही स्थिती बदलेल. शांतता प्रस्थापित होईल.
नितीशकुमारांच्या निमंत्रणानुसार बिहारला जाणार
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा मला फोन आला होता. ते त्यांच्या राज्यामध्ये देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुखांची बैठक बोलवत आहेत. मला त्यांनी निमंत्रित केले. मी जाणार आहे. यानिमित्ताने देशापुढील प्रश्नावर एकत्र येवून भूमिका घेण्याची आवश्यकता दिसते. ती घ्यायची असेल तर विविध राजकीय पक्षांना एकत्र यावच लागेल. सरकारच्या सोबत सामुहिक भूमिका मांडावीच लागेल. त्यासाठी हा प्रयत्न आहे. त्याला माझा व सहकारी मित्रांचा पूर्ण पाठींबा आहे.
राज्य सरकारकडून अंमलबजावणी नाही
राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीनंतर धोरणे जाहीर केली. परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. मी काल मराठवाड्यात होतो, विदर्भातील एका जिल्ह्यात गेलो होतो. त्या सगळ्या ठिकाणी मला एक गोष्ट एेकायला मिळाली, मागील अतिवृष्टी आणि गारपीट याने जे नुकसान झाले त्यासाठी जी मदत जाहीर झाली, ती अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. ही गोष्ट चांगली नाही. शेवटी शेतकरी आयुष्यभर काळ्या आईचे इमान राखतो. लोकांच्या भूकेचा प्रश्न सोडवतो. त्याच्या संकटाच्या काळात या बळीराजाला शासनाने मदत केलीच पाहिजे. तो आग्रह त्यांचा आहे. तो काही चुकीचा नाही. त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न माझ्यासारखे लोक सुद्धा करतील, असे पवार म्हणाले.
दूधाच्या प्रश्नावर घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
दूध व्यवसाय करणारा शेतकरी दर पडल्याने अडचणीत आला आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्याचा निर्णय ठराविक काळासाठी घेतला गेला होता. शेतीला जोडधंदा म्हणून दूध धंदा महत्त्वाचा आहे. जिरायत भागामध्ये दूध व्यवसायावर शेतकऱ्यांचे कुटुंब चालते. आज दूधाची किंमत घसरली आहे. सामान्य शेतकऱ्याच्या दृष्टीने हे अजिबात योग्य नाही. यासाठी मी पुढील दहा-पंधरा दिवसात राज्य सरकारशी विचारविनिमय चर्चा करणार आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेत यातून मार्ग काढण्याची विनंती करणार असल्याचे पवार म्हणाले.
नामांतरणाच्या निर्णयाबाबत वाद नको
बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले आहे. यासंबंधीचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. तो कसा केला, का केला याची चर्चा होवू शकते. परंतु एकदा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यात वाद नको, ही भूमिका सगळे मिळून घेवू. जो निर्णय घेतला असेल त्याची अंमलबजावणी करू, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
Belgaum Varta Belgaum Varta