देहू : येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज (शनिवारी) भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले. पालखी सोहळ्याच्या प्रस्तानासाठी महाराष्ट्र कर्नाटक सह विविध राज्यांच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भाविक देहू नगरीत येऊन दाखल झाले. त्याचप्रमाणे आजच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
पालखी प्रस्थान सोहळया निमित्त आज पहाटे ५ वाजता श्री विठ्ठल रुख्मिनी देवता, श्री संत तुकाराम महाराज महापूजा व शिळामंदिर पूजा पालखी सोहळा प्रमुख व संस्थानचे अध्यक्ष आणि विश्वस्त यांच्या हस्ते पार पडला.
पहाटे ५.३० वाजता तपोनिधी नारायण महाराज पालखी सोहळ्य़ाचे जनक यांच्या समाधीची महापूजा संस्थानच्या अध्यक्ष व विश्वस्थांच्या हस्ते झाली. सकाळी १० ते १२ वाजता पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे काल्याच्या किर्तन झाले. सकाळी ९ ते ११ वाजता तुकोबारायांच्या पादुकांचे पूजन, महापूजा इनामदार वाड्यात झाले. दुपारी २ वाजता पालखी प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमास सुरवात झाली. पालखी प्रस्थान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. सायंकाळी ५ वाजता पालखी मुख्य मंदिर प्रदक्षिणेसाठी भजनी मंडपातून बाहेर पडली. सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पालखी पहिल्या मुक्कामासाठी इनामदार वाड्यात आली. तेथे सायंकाळची मुख्य आरती झाली. उद्या सकाळी देहू येथून पालखी पुढील मार्गासाठी प्रस्थान करणार आहे.