मुंबई : मुंबई काँग्रेस पाठोपाठ प्रदेश काँग्रेसमध्ये फेरबदलाचे वारे वाहू लागले असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हटविण्याची काँग्रेसमधील काही आमदार दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. तर पटोले यांनाच कायम ठेवण्यासाठी प्रदेश काँग्रेसमधील एक गटही दिल्लीत प्रयत्नशील आहे.
भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेणाऱ्या पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्याची काँग्रेसमधील बाळासाहेब थोरात यांचा गट प्रयत्न करत आहे. मध्यंतरी बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यात झालेला वाद अजून मिटलेला नाही. तो धुमसत आहे. त्यामुळे थोरात गटाचे अनेक आमदार हे पटोले यांना हटविण्याची मागणी करत आहेत. सुनील केदार, विजय वडेट्टीवार, शिवाजी मोघे आदी नेते दिल्लीत जावून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जून खरगे यांची भेट घेतली. आणि पटोले यांना हटविण्याची मागणी केली.
तर दुसरीकडे पटोले यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत काँग्रेस राज्यात सक्रीय केली, त्यामुळे त्यांना बदलू नका, यासाठी पटोले यांचे समर्थक राहुल गांधी यांना भेटले आहेत. राहुल गांधी यांनीही पटोले यांच्या कामाचे कौतुक केले आहे. मात्र आता दोन्ही गट आक्रमक झाल्यामुळे मध्यम मार्ग म्हणून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी पुढे आले आहे.
अशोक चव्हाणांचे नाव अध्यक्षपदासाठी
मध्यंतरी काँग्रेसच्या निरीक्षकांनी आमदार आणि नेत्यांशी बोलून अहवाल दिला आहे. त्यात अनेक नेत्यांनी अशोक चव्हाण यांचे नाव या पदासाठी पुढे केले आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीला दहा महिने उरले असताना प्रदेशाध्यक्ष पदाबाबत फेरबदल करणार की पटोले यांना कायम ठेवणार, याबाबत दिल्लीत खल सुरू आहे.